(नवी दिल्ली)
दिल्लीत गेल्यावर्षी घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. गीता कॉलनी या भागातील उड्डाणपुलाखाली पोलिसांना अनेक तुकडे करून फेकलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन पॉलिथिन पिशव्यांमध्ये शीर आणि धडाचे तुकडे आढळून आले. केवळ लांब केसांवरून मृतदेह महिलेचा असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. अन्यथा चेहरा ओळखण्यापलिकडच्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. आता या हत्याकांडाच्या तपासानंतर कोणती धक्कादायक माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीतील महरोली परिसरात श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे फेकून देण्यात आले होते. या घटनेला काही महिने लोटल्यानंतर अशाप्रकारचे आणखी एक थरकाप उडवणारे हत्याकांड उघडकीस आले आहे. बुधवारी गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ दुर्गंधी पसरल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांना दोन पॉलिथिन पिशव्यांमध्ये बांधलेले मृतदेहाचे तुकडे आढळले. एका पिशवीत शीर तर दुसर्या पिशवीत मानवी शरिराचे अवयव होते. मृतदेहाच्या लांब केसावरून मृतदेह महिलेचा असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. मात्र मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट होती, चेहरा ओळखता येत नव्हता. त्यामुळे अद्याप या मृतदेहाची ओळख
पटलेली नाही.
दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. यानंतर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. मृत महिलेचे वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कोतवाली पोलीस ठाण्यात कलम 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी हत्याकांडानंतर दिल्ली पोलिसांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. याप्रकरणी पोलिसांना नोटीस बजावणार असून मृत तरुणी कोण होती? तिच्या मारेकर्याला कधीपर्यंत अटक करणार? एकापाठोपाठ एक थरकाप उडवणार्या हत्या दिल्लीत का होत आहेत? असे सवाल उपस्थित करत कायदा व्यवस्था कोलमडली असल्याची संतप्त प्रतिक्रिया मालीवाल यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.