(संगमेश्वर / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेला शोध कलारत्नांचा हा उपक्रम म्हणजे बाल कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा अभिनंदनीय प्रयोग असून यातून भावी कलाकार घडतील असा विश्वास पंचायत समिती संगमेश्वरचे शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने यांनी व्यक्त केला .
व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर येथे आज जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत शोध कलारत्नांचा कार्यशाळा घेण्यात आली . या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्रिभुवने हे बोलत होते . यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव धनंजय शेट्ये , विस्तार अधिकारी विनोद पाध्ये , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे , कलाशिक्षक सोमनाथ कोष्टी , सुरज मोहिते , प्रदीप शिगवण , ऋतुराज जाधव , अमोल पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यकार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या पहिली ते बारावी इयत्तांमधील बालकलाकार शोधण्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन एप्रिल महिन्यात करण्यात आले होते . या स्पर्धेतून प्रत्येक तालुक्यातून साधारणपणे १६ विद्यार्थ्यांची निवड “शोध कलारत्नांचा’ या कार्यशाळेसाठी करण्यात आली होती . जिल्ह्याच्या ९ तालुक्यात आज एकाच दिवशी या कार्यशाळेसाठी १४४ विद्यार्थी सहभागी झाले . या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण विभागातर्फे वॉटर कलर , पोस्टर कलर , पेस्टल कलर , कागद , पेंसिल , पॅड असे साहित्य पुरविण्यात आले . हातात कला साहित्य आल्यानंतर बाल कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद तरळला . विद्यार्थ्यांनी दिवसभरात शक्य होतील अशी चित्रे विषयाला धरुन तयार केली . यातून विद्यार्थ्यांचे अंतर्मन कागदावर उमटल्याचे पहायला मिळाले . विद्यार्थ्यांना पुढील कार्यशाळे पर्यंत सरावासाठी प्रत्येकी १० ड्रॉइंग पेपर सोबत देण्यात आले असून त्या कागदांवर त्यांनी घरी सराव करायचा आहे, अशी माहिती परिक्षा समन्वयक शशिकांत त्रिभुवने यांनी दिली .
विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित पालकांना देखील यावेळी कला विषयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले . उपस्थित पालकांना पैसा फंडचे कलादालन आणि कलावर्ग दाखविण्यात आला . पालकांनी कलादालन पाहून आपण थक्क झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली . भविष्यात आमची मुले देखील अशीच चित्रनिर्मिती करतील असा विश्वास पालकांनी पैसा फंडचे कलादालन पाहून व्यक्त केला .
दुपारच्या सत्रात शोध कलारत्नांचा कार्यशाळेसाठी उपस्थित १६ विद्यार्थ्यांना पैसा फंडचा कलावर्ग आणि कलादालन दाखविण्यात आले . येथील वेगवेगळ्या विषयांवरील चित्रे पाहून या मुलांनी भविष्यात आम्ही देखील अशा कलाकृती तयार करु असा विश्वास व्यक्त केला . व्यापारी पैसा फंड संस्था कलाविषयक सर्व उपक्रमांना सहकार्य करेल , असे आश्वासन संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने यांना दिले .