(निवोशी – गुहागर / उदय दणदणे)
गुहागर तालुक्यातील निवोशी हे गाव आजही अनेक सुखसोयींपासून दुर्लक्षित असून त्याचा परिणाम हा शिक्षण व्यवस्थेवर झाला आहे. लोकप्रतिनिधींकडून अनेक वेळा निवोशी गाव दत्तक घेण्याच्या वलग्ना झाल्या, मात्र अद्याप पावेतो तसा कोणताच लोकप्रतिनिधी गाव दत्तक घेण्यासाठी पुढे सरसावले नाहीत.
निवोशी गावचा मंदावलेला शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी गेली पंचवीस वर्षे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अभिमानास्पद कार्यरत असणारी श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ (निवोशी) ही संस्था नुकतीच २०२१ मध्ये नोंदणीकृत होऊन जलदगतीने कामाला लागली आहे. संस्थेच्या वतीने निवोशी गावाचा ग्रामीण ते मुबंई पातळीवर शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ -निवोशी आयोजित मुबंईतील निवोशी रहिवासी तसेच पालक व विद्यार्थी यांचा शैक्षणिक प्रबोधन मेळावा रविवार दिनांक.२५ डिसेंबर २०२२ रोजी शिरोडकर हॉल (परेल ) मुबंई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ-निवोशी या संस्थेची स्थापना ८ डिसेंबर १९९६ रोजी गिरगाव मुबंई येथे होऊन आजवर संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी विविध शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात.
पुढील येणाऱ्या १० वर्षात प्रत्येक विद्यार्थी पदवीधर झाला पाहिजे हा संकल्प ठेऊन त्यासाठी संस्थेच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जाईल.विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्नाने अभ्यास करून आपली उन्नती व समाजाचा विकास करावा. गावातील प्रत्येकाने शिक्षण प्रवाहात आपले योगदान देऊन नोंदणीकृत झालेल्या आपल्या या हक्काच्या संस्थेचे आजीव सभासदत्व होऊन संस्थेला सहकार्य करावे अशी इच्छा व्यक्त करत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच निवोशी गावचे लोकप्रिय समाजसेवक नारायण मांडवकर, नारायण अवेरे, प्रदीप अवेरे, अशोक भोसले, विनोद अवेरे, पत्रकार-उदय दणदणे, श्वेता होरंबे, यांनी संस्थेला शुभेच्छा देऊन शैक्षणिक प्रबोधनपर उपस्थितांना आपल्या मनोगतातुन मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक- अर्जुन धावडे, अर्जुन होरंबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर प्रसंगी कु.भक्ती मांडवकर ही आठवीत शिकणाऱ्या चुमूकली विद्यार्थीने मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्ही खूप अभ्यास करून शिक्षणात प्रगती करून संस्थेचे व निवोशी गावाचे नाव प्रगतीपथावर ठेऊ असा संकल्प करून उपस्थितांची मने जिंकली.संस्थेच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय होरंबे, समाजसेवक-नारायण मांडवकर, नारायण अवेरे यांच्या शुभहस्ते उपस्थित कार्यकर्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच महिलांना एकसंघटीत ठेवण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या जेष्ठ महिला कार्यकर्त्या -अरुणा धावडे यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वाटप करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सचिव-सुरेश होरंबे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार नारायण अवेरे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला निवोशी गावातील नानेवाडी, गणेशवाडी, कातळवाडी, भेलेवाडी, मुबंईस्थित रहिवासी तसेच संस्थेचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर शैक्षणिक प्रबोधन मेळावा श्री गजानन विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातून यशस्वीपणे संपन्न झाला.