(कोलकाता)
आयपीएलचा १९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात हैदराबादकडून सलामीवीर हॅरी ब्रुकने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर हैदराबादने कोलकातासमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना रिंकू सिंग, नितीश राणा यांनी धुव्वाधार फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. मात्र केकेआरला २० षटकांअखेर २०५ धावाच करता आल्या. त्यामुळे २३ धावांनी हैदराबादने विजय मिळविला.
हॅरी ब्रूकच्या (५५ चेंडूत १०० धावा) शतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ४ गडी गमावून २२८ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना केकेआरचा संघ ७ गडी गमावून केवळ २०५ धावाच करू शकला. त्याचवेळी हैदराबादकडून मार्को यानसेन आणि मयंक मार्कंडेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. सामन्यात दोन्ही डावांत मिळून ४३३ धावा झाल्या.
धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. रहमानउल्ला गुरबाजला भोपळाही फोडता आला नाही. डावाच्या पहिल्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमारने त्याला बाद केले. कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर पराभवाचा सामना करावा लागला. त्याचा सनरायझर्स हैदराबादने २३ धावांनी पराभव केला. कोलकाताला शेवटच्या षटकात ३२ धावांची गरज होती. रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर क्रीजवर होते. रिंकूने गुजरातविरुद्ध शेवटच्या षटकात २९ धावांचा पाठलाग केला होता. मात्र, यावेळी चमत्कार घडला नाही. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेश यादव बाद झाला. त्यानंतर केवळ आठ धावा झाल्या. रिंकूने षटकार मारला. पण तो पुरेसा नव्हता.
तत्पूर्वी केकेआरचा कर्णधार नितेश राणा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर हॅरी ब्रुकने सुरुवातीपासून केकेआरच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि ५५ चेंडूंत शतक ठोकले. कर्णधार एडन मार्करम यानेही २६ चेंडूंत ५० धावा फटकावल्या. या दोन वादळी खेळींच्या जोरावर हैदराबादने केकेआरसमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, या लक्ष्याचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता संघाला एवढे मोठे लक्ष्य गाठता आले नाही. परंतु नितेश राणा आणि रिंकूने केलेल्या फटकेबाजीमुळे २०५ धावा करता आल्या.