(रत्नागिरी)
शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर आणि स्थानिक भाषेत हवामान अंदाजाची माहिती मिळावी, यासाठी भारतीय हवामान विभागाने ‘मेघदूत’ या अॅपची निर्मिती केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोबाईलवर घरबसल्या स्थानिक ठिकाणच्या हवामानाचा अंदाज समजणार आहे.
हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना वेळेवर आणि अचूक मिळणे खूप गरजेचे आहे. कारण शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक आधीच अंदाज मिळाला तर ते सजग होऊन शेतात आवश्यक गोष्टी पटकन करता येतील व संभाव्य नुकसानपासून वाचता येईल. अचूक हवामानाचा अंदाज न मिळाल्याने शेतकरी गाफील राहतात. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान होते व मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. गेल्यावर्षी ही स्थिती उद्भवली होती. एवढेच नाही, तर अचूक हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना पिकांचे व्यवस्थापन करणे देखील सोपे जाते.
या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून भारतीय हवामान विभाग शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर आणि स्थानिक भाषेत हवामान अंदाजाची माहिती मिळावी, यासाठी ‘मेघदूत’ अॅपद्वारे त्यांच्या गावपातळीवरील हवामानाची माहिती त्यांच्या भाषेत मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत असून, यासाठी शेतकऱ्यांना फक्त एका फोन नंबरवर कॉल करावा लागेल.
पिकांची नुकसानी टळणार
अद्याप कुठलाही नंबर यासाठी जारी केला नसून लवकरच क्रमांक जारी करणार आहे. हा नंबर फक्त हवामान अंदाजाच्या माहितीसाठी असेल. फक्त हा नंबर डायल केला की, लगेच त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत त्यांच्या गावपातळीवरील हवामानाच्या अंदाजाची माहिती मिळेल. त्यामुळे या सुविधेचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून संभाव्य पिकांच्या नुकसानीपासून ते वाचू शकतात. एवढेच नाही, तर या अॅपद्वारे हवामानासमवेतच शेतातील पिके आणि पशुधनाची देखील माहिती इंग्रजी आणि स्थानिक भाषांमध्ये दिली जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.