(रत्नागिरी)
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त प्रमाणात शास्त्रीय पद्धतीने अवलंब करावा व आवश्यकता भासत असल्यासच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी, जेणेकरून झाडांचे आरोग्य निकोप राहून उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा होईल यातून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व गुहागर तालुका कृषी अधिकारी आयोजित काजू व आंबा पिक व्यवस्थापन मार्गदर्शन कोतळुक, गुहागर येथे क्षेत्रिय किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आंबा, काजू बागायतरांनी कीड रोगांचा प्रादुर्भाव पाहून आर्थिक नुकसान पातळीच्या वर किड रोगांचा प्रादुर्भाव असेल तरच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी अनावश्यक फवारण्या करू नयेत. त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. तसेच कीटकनाशके व बुरशीनाशके एकमेकांमध्ये मिसळताना ती एकमेकांमध्ये मिसळण्यास सुसंगत आहेत की नाही याची खात्री करावी असे डाॅ.विजय देसाई, किटक शास्त्रज्ञ, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले.
आंब्याच्या झाडाचा वय व विस्तार पाहूनच झाडांना पॅक्लोब्युट्रोझाॅल संजिवक वापरावे. पॅक्लोब्युट्रोझाॅल संजिवक वापरलेल्या झाडांचे खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करावे. फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घ्यावी असे डाॅ. अजय मुंज किटक शास्त्रज्ञ, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, राजेंद्र माने उपविभागीय कृषि अधिकारी, चिपळूण, तालुका कृषि अधिकारी गुहागर अमोल क्षीरसागर, डाॅ.गोपाळ गोळवणकर संशोधन सहयोगी, हाॅर्टसॅप आंबा पिक, बी.टी.एम. आत्मा सागर आंबवकर, तसेच कृषी विभाग व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.