( लांजा )
तालुक्यातील गोविळ येथील सुधीर श्रीपाल कदम याला त्याच्याच वाडीत राहणाऱ्या विजय लखु पवार यांनी जाब विचारल्याच्या रागातून मारहाण केल्याची घटना रविवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गोविळ बौद्धवाडी येथील सुधीर श्रीपाल कदम (वय ३७, रा. पुलपाडा रोड विरार ईस्ट, सध्या रा.गोविळ बौद्धवाडी) हे नोकरीनिमित्त कुटुंबांसह मुंबईत राहत असून ते त्यांच्या नातेवाईकांच्या जलदान विधी निमित्त गोविळ येथे आले होते. जलदानाचा विधी झाल्यानंतर सुधीर कदम हे आपल्या घरी जात असताना वाटेत भेटलेल्या विजय लखु पवार (रा. बौद्धवाडी गोविळ, ता. लांजा) यांना कदम यांनी सहा महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांची कॉलर धरून शिवीगाळ केल्याप्रकरणी विचारणा केली आणि ते तिथून निघून गेले.
१२ फेब्रुवारी रोजी दुपारी कदम हे पवार यांच्या घरासमोरून जात असताना जाब विचारल्याच्या रागातून पवार यांनी कदम यांना मारहाण केली. या मारहाणीत कदम यांच्या डोक्याला दुखापत झाली. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात विजय लखु पवार व इतर दोन महिलांवर गुन्हा दाखल झाला असून याबाबत अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.