( मुंबई )
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये विजापूरच्या आदिलशाहचा सेनापती अफझल खान याला ठार मारण्यासाठी वापरलेले वाघनखं परत देण्यास ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवल्याने महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार येत्या काही दिवसांत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी लंडनला जाणार आहेत.
शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखाने अफझल खानाचा वध केला ते वाघनखं सध्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. जर सर्व काही ठरल्याप्रमाणे घडले तर, शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध वाघनखं काही महिन्यांतच महाराष्ट्रात येऊ शकेल. “आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांचे पत्र मिळाले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघनखं परत देण्याचे मान्य केले आहे. हिंदू कॅलेंडरच्या आधारे शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारले त्या दिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला ते परत मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” असे मुनगंटीवार म्हणाले.
“सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याव्यतिरिक्त, आम्ही शिवाजीची जगदंबा तलवार यांसारख्या इतर वस्तू देखील परत मिळतील का? हे पाहणार आहोत. त्यासुद्धा ब्रिटनमध्येच प्रदर्शनास आहेत. वाघनखे पंजे परतीच्या मार्गावर आहेत ही वस्तुस्थिती महाराष्ट्रासाठी आणि तेथील जनतेसाठी एक मोठे पाऊल आहे. अफझलखानच्या वधाची तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरवर 10 नोव्हेंबर आहे, परंतु आम्ही हिंदू तिथी कॅलेंडरवर आधारित तारखा ठरवत आहोत,” असे मुनगंटीवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं हा इतिहासाचा अमूल्य ठेवा असून, त्याच्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही वाघनखं महाराष्ट्रात येणे हे प्रत्येक मराठी माणसासाठी ऐतिहासिक घटना ठरणार आहे. यासाठी मुनगंटीवार, प्रधान सचिव संस्कृती (डॉ. विकास खारगे) आणि राज्याच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे हे लंडनमधील व्ही अँड ए आणि इतर संग्रहालयांना भेट देतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाने दिली आहे. 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर हे तीन सदस्यीय पथक सहा दिवसीय ब्रिटन दौऱ्यावर जाणार आहे.