(मुंबई)
एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. खुद्द उद्धव ठाकरेंचेच मुख्यमंत्रीपद गेल्याने राज्यभरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जात आहे.
शिवसैनिकांच्या टिकेला सामोरे जावे लागू नये म्हणून महाविकास आघाडीतील तत्कालीन काही मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यातील कमेंट बॉक्स बंद केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाटणचे आमदार शंभूराजे देसाई, जळगावचे गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. शिवसैनिक गद्दार म्हणतील म्हणून त्यांनी कमेंट बॉक्स बंद केला असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हे सर्वात मोठे बंड आहे. यापूर्वी राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे यांनी बंडखोरी केल्याने सेनेला फटका बसला होता. आता तर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसैनिक सदर आमदारांना गद्दार म्हणत असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे.