(मुंबई)
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि नाव दिल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परवा न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवत शिवसेनेला व्हिप बजावता येणार नाही, असं म्हणत पुढची सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला व्हिप बजावण्यास आणि कारवाई करण्यास मनाई केलेली असतांना रविवारी शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरद गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हिप बजावला आहे.
गोगावले म्हणाले की, आम्ही ५५ आमदारांना व्हिप बजावला आहे. आजपासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भात हा व्हिप बजावला आहे. आम्ही कुणावरही कारवाई करत नाही. सध्या फक्त अधिवेशनाला पूर्णवेळ हजर राहण्यासंदर्भात व्हिप बजावला आहे. कारवाईसंबंधीचा विचार दोन आठवड्यांनी करु, असंही ते म्हणाले.