(मुंबई)
खरी शिवसेना कोणाची यावरून राज्यात वाद सुरू असताना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या वादात निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिवसेनेचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नावही गोठवले. यानंतर दोन्ही गट आक्रमक होत त्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. अशातच राजकीय वर्तुळातून मोठ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. सोमवारी शिवसेनेचे खासदार आणि सध्या कोठडीत असलेले संजय राऊत यांची शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर प्रतिक्रिया आली आहे.
राऊतांना न्यायालयात नेत असताना माध्यमांनी त्यांना सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत विचारले आणि चिन्ह गोठवण्यात आल्याबाबत देखील प्रतिक्रिया देण्याचा आग्रह केला. त्यावेळी राऊत म्हणाले, चिन्ह गेल्याची ही आमचीच पहिलीच वेळ नाही. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधीही अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. तीनवेळा त्यांचे चिन्ह बदलले होते. जनसंघालाही अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. हे काही नवीन नाही. हे नवं चिन्ह शिवसेनेत नवी क्रांती घडवेल. नावात काय आहे, खरी शिवसेना कोणाची हे सगळ्यांना माहित आहे, असेही ते म्हणाले. आधी ज्या पक्षांची चिन्हे गोठवले गेली ते पक्ष आज मोठे झाले आहेत. आम्हीही मोठे होऊ, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.