(दापोली)
आदिवासी शिक्षिकेला त्रास देणा-या रत्नागिरी जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पूजार यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन दापोलीचे गटविकास अधिकारी आर एम दिघे व गटशिक्षण अण्णासाहेब बळवंतराव यांना देण्यात आले आहे.
शिक्षणाधिका-यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा यांनी आपले ४७८ वे उपोषण सीईओ दालनासमोरच करणार असल्याचा इशाराही दिला आहे. पिंगला गिरधर रावताळे यांच्या वरिष्ठश्रेणीचा प्रस्ताव जाणीवपूर्वक गायब करून व यादीतून नाव वगळून वेतनापासून वंचित ठेवणा-यांची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनास दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी निवेदन देऊन आंदोलन केले होते. त्या पत्रावर शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या पत्रानुसार गटशिक्षण अधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना कळविले आहे की, पिंगला गिरधर रावताळे उपशिक्षिका यांचा वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रस्ताव आतापर्यंत 3 वेळा प्राप्त झालेला आहे. परंतू त्यांना नोकरी लागल्यापासून १२ वर्षे पूर्ण होत नाहीत, त्यांची पात्रता डी.एड. व बी. एड. अशी आहे. म्हणून त्या पात्र होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.
शिक्षिकेला त्रास देत असल्याचा आरोप
पिंगला गिरधर रावताळे उपशिक्षिका यांच्या बॅचमधील बी.एड. व डी.एड. अशी समान पात्रताधारक सर्व शिक्षकांना २०२० पासून वरिष्ठ वेतनश्रेणी देणे सुरू आहे. परंतु पिंगला गिरधर रावताळे ह्या आदिवासी समाजाच्या महिला शिक्षिका असल्यामुळे व सुशिलकुमार पावरा यांच्या पत्नी असल्यामुळे शिक्षण विभागातील काही दोषारोपित कर्मचारी व अधिकारी यांना कारवाईपासून वाचविण्यासाठी सुडबुद्धीने प्रस्ताव गायब करण्याचे व वेतनश्रेणीचा लाभ मिळू नयेत, म्हणून वामन जगदाळे हे काम करत आहेत. म्हणून शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा. अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.