(मुंबई)
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे त्याचा जीआर म्हणजे शासन निर्णय जारी करणे प्रलंबित होते. तो काढण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. हा जीआर जरी आजच्या तारखेने जारी होत असला तरी त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सोमवारी बोलताना सांगितले.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने २२ डिसेंबर २०२२ रोजी घेतला होता. अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश होता. दरम्यान, घोषित झालेल्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याबाबतचा शासन निर्णय जारी होऊ शकला नव्हता. सोमवारी तो जारी करण्यात आला. मात्र शिक्षकांचे या विलंबामुळे अगदी महिन्याभराचेही नुकसान होऊ नये, म्हणून या जीआरची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून म्हणजेच एक महिना आधीपासून करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
१० सप्टेंबर रोजी शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस
लहान मुलांच्या जीवनात त्यांच्या आजी-आजोबांचे स्थान अतिशय महत्वाचे असते. ज्या मुलांना आजी-आजोबांचे प्रेम मिळते, ती मुले जास्त आनंदी असतात. भारतीय एकत्र कुटुंब व्यवस्थेचा तो एक फायदा आहे. या आजी-आजोबांचा शाळांमध्येही सन्मान व्हावा, यासाठी या वर्षी १० सप्टेंबर रोजी शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात येणार आहे. आजी-आजोबांना त्यांच्या नातवंडांच्या शाळेत बोलाविण्यात येईल. विविध कार्यक्रमांचे या दिवशी आयोजन करण्यात येणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.