(रत्नागिरी)
शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टीएआयटी) राज्यात घेण्यात आली. यानंतर आता फेब्रुवारीमध्ये ही चाचणी घेण्याचे संकेत आहेत. प्रत्यक्षात मात्र शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. टीईटीनंतर पात्र विद्याथ्र्यांची संख्या एकीकडे वाढत आहे. तर मात्र भरती प्रक्रियाबाबत उदासीन सरकारच्या भूमिकेविषयी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेले भावी शिक्षक संताप व्यक्त करत आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल परीक्षा परिषदेने नुकताच जाहीर केला. राज्यात आतापर्यंत पार पडलेल्या टीईटी परीक्षेतील ८६ हजार ४११ उमेदवार शिक्षक पदी नियुक्ती होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची ३१ हजार ४७२ पदे रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित संस्थांच्या शाळा यांच्यावर शिक्षकांची नेमणूक करण्याचे नियोजन शासनाकडून करण्यात आले, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ९ ऑगस्ट २०१९ रोजी पहिली यादी जाहीर झाली.
इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी इंग्रजी गणित व विज्ञान विषयाकरिता अर्हता प्राप्त उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे तब्बल २ हजार ३९२ पदे रिक्त राहिल्याचेही समोर आले होते. उर्वरित पदांची भरती प्रक्रिया अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. काही तांत्रिक अडचणींचे कारण देत उर्वरित पदांची भरतीचा मुहूर्त लांबविला जात आहे.
राज्यात टीईटी पेपर १ मध्ये पात्र असलेले ४२ जार ७८६ उमेदवार प्राथमिक शिक्षक पदासाठी तर पेपर २ मध्ये पात्र असलेले ४३ हजार ६२५ उमेदवार माध्यमिक शिक्षक पदासाठी इच्छुक असलेले आता नोकरी कधी मिळणार याची वाट पहात आहे. यामुळे भरतीचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.