( मुंबई )
खासागी शाळांमधील शिक्षक एकाच ठिकाणी काम करून विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवतात. मग शासकीय शाळांमधील शिक्षकांच्या सतत बदल्या करण्याची खरंच आवश्यकता आहे का ? असा प्रश्न आहे. त्यामुळे भविष्यात शिक्षकांचा बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आणि मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मात्र हा निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या थांबवता येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
३१ मे पूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे सरकारचे धोरण आहे. तसे २०२१ च्या शासन आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. उच्च न्यायालयानेही शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देताना केसरकर यांनी, शिक्षकांवरील ताण कमी व्हावा, शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील यासाठी व्यवस्था निर्माण करण्यासाठी निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांच्या बदल्या होऊ नये असं मी म्हटलं आहे, सतत बदल्या करणं योग्य आहे की नाही याबाबत विचार सुरू आहे. हा धोरणात्मक निर्णय मी एकटा घेऊ शकणार नाही, मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करावी लागेल, कॅबिनेटला विश्वासात घेऊन या शिक्षकांच्या बदल्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल, असे केसरकर यांनी सांगितले.