(राजापूर)
खारेपाटण, गुरववाडी येथील नितीन सुभाष चव्हाण वय ३८ या तरुणाचा छातीत बंदुकीची गोळी लागुन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी खारेपाटण कणकवलीचे पोलीस अधिक तपास करीत असुन राजापूरच्या हद्दीत गुन्हा घडल्याने राजापूरचे पोलीस देखील घटनास्थळी रवाना झाले होते. मयत नितीन चव्हाण हा मंगळवारी रात्री राजापूर तालुक्यातील पन्हळे, शेजवली परीसरात शिकारीसाठी आला होता. त्यावेळी त्याने आपली बंदुक छातीजवळील भागाकडे तोंड करुन ठेवली होती. त्यानंतर नक्की काय प्रकार घडला ते समजले नाही. मात्र नितीन चव्हाण यांच्या छातीतुन गोळी घुसुन ते जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवर कॉल करुन माहिती दिली, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर नितीनचे नातेवाईक त्या जंगलात पोहचले.
उपचारासाठी त्याला कणकवली येथे नेत असता वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी खारेपाटण व कणकवली पोलीस तपास करीत असुन राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली असल्याने राजापूर पोलीस सुध्दा घटनास्थळी पोचले होते. शिकारीसाठी नितीन एकटाच गेला होता का, की आणखी कुणी होते ते मात्र समजू शकलेले नाही. नितीनच्या मृत्युने खारेपाटण परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.