दापोली तालुक्यातील साकुर्डे येथील शिकारीसाठी गेलेल्या विनोद बैकर याचा मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून जंगली श्वापदांची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे ४ बॉम्ब दापोली पोलिसांनी संशयितांकडून ताब्यात घेतले आहेत. हे बाॅम्ब न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करण्यात आल्याची माहिती दापोलीचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.
साकुर्डे येथील विनोद बैकर हे ३१ मार्च रोजी गावातीलच देवरहाटीतील जंगलात दुपारी बंदूक घेऊन शिकारीसाठी गेले हाेते. तेथेच त्यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. विनोद बैकर यांच्या मृतदेहाजवळ एक बंदूकही सापडली हाेती. मात्र, विनोद बैकर यांच्यासोबत संदेश सुरेश जोशी (२८), विनायक मनोहर बैकर हे साकुर्डे येथील दोनजण शिकारीला गेल्याचे तपासात उघड झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना ३ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दापोली पोलिसांनी ३ बंदुका ताब्यात घेतल्या असून, यातील दोन बंदुका या विनापरवाना असल्याचे पुढे आले आहे. तर एका बंदुकीचा परवाना शेती संरक्षणासाठी आहे. दापोली पोलिसांनी या दोन संशयिताची चौकशी करून त्यांच्याकडून माहिती घेतली असता मृत्यू पावलेल्या विनोद बैकर याने शिकार करण्यासाठी कोणाकडून तरी बॉम्ब आणले होते. तो मृत्युमुखी पडण्याच्या अगोदर या बॉम्बचा वापर करून एका रानडुकराची शिकार करण्यात आल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पण, चार बॉम्ब अजूनही शिल्लक असल्याची माहिती मिळाल्यावर डॉ. सुदर्शन गायकवाड यांनी रत्नागिरी पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाला दापोली येथे पाचारण केले. त्यानंतर या पथकाने साकुर्डे गणेशनगर येथे जाऊन तेथे ठेवलेले चार बॉम्ब हस्तगत करून नष्ट केले. नष्ट केलेल्या बॉम्बची राख आता फॉरेन्सिक प्रयोगशाळेत बॉम्ब तयार करण्यासाठी कोणत्या पदार्थाचा वापर करण्यात आला होता. याची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली. बॉम्ब नष्ट करण्यासाठी या पथकामध्ये प्रमुख दिलीप जाधव, रेवाळे, सागर पवार, रहाटे, अशोक पाटील, श्वान पथकातील श्वान ‘रॉक’ व त्याला हाताळणारे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.