(संगमेश्वर)
अनेकवेळा चुकीच्या घटनांबाबत शिकलेले लोकच शासन व्यवस्थेला प्रश्न विचारत नसल्याने, अशा प्रश्न न विचारणाऱ्या शिकलेल्या लोकांमुळेच लोकशाही धोक्यात येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असून उत्तम नागरिक घडवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात लोकशाहीतील हक्क अधिकाऱ्यांचा समावेश करावा,लोकशाहीच्या मजबुती करणासाठी निवडणूक आयोगाने गाव पातळीवर उपक्रम राबवावेत अशी भूमिका गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी देवरुख येथे रविवारी ( दिनांक २४ डिसेंबर २०२३) आयोजित केलेल्या लोकशाही मेळाव्यात व्यक्त केली.
गाव विकास समितीच्या वतीने सहाव्या लोकशाही मेळाव्याचे आयोजन देवरुख येथे करण्यात आले होते.यावेळी बोलताना सुहास खंडागळे यांनी सध्याच्या लोकशाहीवर भाष्य केले.ग्रामपंचायत निवडणुका होतात मात्र जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत नाहीत. नागरिक म्हणून आपण याबाबत प्रश्न विचारणार आहोत की नाही?ग्रामीण भागाचा विकास ज्या संस्थांच्या माध्यमातून चालतो त्यांच्या निवडणुका दोन दोन वर्षे होत नसतील तर हे दुर्दैव आहे असे खंडागळे यावेळी म्हणाले. लोकशाही आपल्याला पुस्तकात दिसते मात्र सरकारी कार्यालयात सामान्य माणसाला लोकशाही अनुभवायला मिळत नाही.सामान्य माणसाला त्याच्या कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात असा टोला सुहास खंडागळे यांनी लगावला. ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील ऑफिस,जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची कामे रखडलेली असतात. नागरिकांची सनद नावाचा प्रकार असून सुद्धा या नागरिकांची कामे होत नाहीत याकडे सुहास खंडागळे यांनी लक्ष वेधले.नागरिकच या नागरिकांच्या सनदी बाबत गंभीर नाहीत.नागरिकांना याची माहिती नाही.नागरिकांचे अधिकार नागरिकांना मिळावेत असे राजकीय व्यवस्थेला देखील वाटत नाही. लोकशाही मूल्य लोकांपर्यंत पोहोचली नसल्याने अशा पद्धतीच्या अडचणी येतात असेही सुहास खंडागळे यावेळी म्हणाले. ज्यांचं पोट भरलेलं आहे अशा लोकांची लोकशाही बाबतची नकारात्मकता ग्रामीण भागात लोकशाही पोहोचण्यात अडथळा असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.ज्यांचे पोट रिकामे आहे,जे संघर्ष करत आहेत,ज्यांना समस्या भेडसावत आहेत असेच लोक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कार्य करतील असा विश्वासही सुहास खंडागळे यांनी यावेळी व्यक्त केला.
पाच वर्षे गॅरंटी असणाऱ्या देवरुख संगमेश्वर साखरपा रस्त्याची डांबर खाल्ली कुणी ?
देवरुख संगमेश्वर साखरपा रस्त्याला पाच वर्षाची गॅरंटी शासनामार्फत दिली जाते. मात्र काम पूर्ण झाल्यावर या रस्त्याची डांबर अवघ्या तीन वर्षात निघून जाते.त्यामुळे पाच वर्ष गॅरंटी असणाऱ्या रस्त्याची डांबर नेमकी खाल्ली कुणी?हा प्रश्न विचारण्याची मानसिकता आणि धाडस नागरिकांमध्ये असायला हवं.करोड रुपये खर्च करून होणारे रस्ते दोन-तीन वर्षात खराब होत असतील तर या बाबत नागरिकांनी जागृत असणं हे लोकशाहीत अपेक्षित आहे.
आपल्याला निवडणुकांच्या काळात मोफत वाटप करणारे, पैशांच्या जीवावर राजकारण करणारे धन दांडगे हे नेते वाटतात.अशा लोकांच्या ताब्यात लोकशाही गेल्याने खऱ्या अर्थाने नागरिकांना अपेक्षित असणारा विकास होत नाही. नागरिकांचा आर्थिक विकास न करता सामान्य नागरिकांना धनदांडगे त्यांच्या वर अवलंबून ठेवतात ही परिस्थिती अनेक भागात असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सर्वसामान्यांचे असतील तर त्या प्रश्नांची जाण असणारे लोक सत्तेत असायला हवेत असेही सुहास खंडागळे यावेळी म्हणाले.
केवळ पर्यटन विकासावर कोकणचा विकास होणार नाही.त्यासाठी तालुका निहाय एमआयडीसी विकसित करणे गरजेचे आहे. असे खंडागळे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.गोव्यात पर्यटन विकास करण्यात आला. मात्र तरीही तेथील तरुण रोजगारासाठी आजही मोठ्या शहरात स्थलांतरित होतोय. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून काही प्रमाणात विकास साधता येईल परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आयटी मधून शिक्षण घेतले, इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स किंवा कलाक्षेत्रात शिक्षण घेतल आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणानुसार रोजगाराच्या संधी जिल्ह्यात किंवा तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध व्हायला हव्यात. अशा प्रकारचे इंडस्ट्री कोकणात यायला हवी. आयटी सेक्टर,फूड प्रोसेसिंग शेती विकास याकडे लक्ष द्यायला हवे.धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा.कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ असायला हवे असेही सुहास खंडागळे यावेळी म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था पायाभूत सुविधा याबाबत आजही अनेक समस्या असून त्या सोडवण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सजग असायला हवं. सर्पदंश वरील उपचार तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अनेक वेळा जीव गमावा लागतो. याबाबत आता लढा उभारावा लागेल. ग्रामीण भागातील आरोग्यवस्थाकडे आरोग्य विभागाचे लक्ष नाही.जिल्हा परिषद केंद्रशाळा या सेमी इंग्रजी माध्यमाच्या कराव्यात असेही खंडागळे यावेळी म्हणाले.
यावेळी गाव विकास समिती संघटनेमार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील कर्तृत्वान महिला व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण शिक्षणाच्या दर्जा सुधारावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे तरुण शिक्षक संदेश झेपले, श्रीकांत शिंदे व जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणारे प्रयोगशील शिक्षक कृष्णा मिस्त्री गुरुजी यांचा देखील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा देखील यावेळी बक्षीस वितरण समारंभ पार पडला. कार्यक्रमादरम्यान व गाव विकास समितीच्या महिला अध्यक्ष दीक्षा खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड,,कृषी तज्ञ राहुल यादव,सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले, विशेष निमंत्रित अभिनेते इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,संघटन प्रमुख सुहास खंडागळे उपाध्यक्ष मंगेश धावडे,उपाध्यक्ष व कृषी तज्ञ राहुल यादव सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले, महिला संघटना अध्यक्ष दीक्षा खंडागळे गीते, देवरुख अध्यक्ष अनघा कांगणे, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुजमिल काजी, सुनिल खंडागळे, मनोज घुग, दैवत पवार, नितीन गोताड, वैभव पवार, पूजा घुग, महेश धावडे, विनोद पाष्टे, अमित गमरे, सुकांत पडळकर, महेंद्र घुग, उजमा मापारी खान आदींसह लोकशाही प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.