(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावर खानपान सेवेसाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल २ कोटी ३८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. या खर्चाची सरासरी लक्षात घेतली, तर रोज १ लाख ९३ हजार रुपयांचा खर्च खानपानावर होत असल्याचे दिसून येते.
बारामतीतील करंजे पूल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीवरून सरकारकडून पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा आजपर्यंत झालेला विमान प्रवास खर्च, विदेश, परराज्य निवास खर्च, चहापान खर्च, जाहिरात खर्च याबाबतची माहिती यादव यांनी मागविली आहे. सात महिन्यांत जाहिरातींवर ४२ कोटींचा खर्च शासकीय तिजोरीतून शिंदे – फडणवीस सरकारने केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खानपानावर २ कोटी ३८ लाखांचा खर्च तीन महिन्यांतच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सह्याद्री अतिथिगृहातील चहा, कॉफी, नाश्त्यासाठी ८ दिवसांत ९१ हजार ५०० रुपयांचा खर्च केल्याचे दिसून येत असून, मुख्यमंत्री बैठक व त्यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तींसाठी चहा, कॉफी, थंड पेयासाठी ३ लाख ४९ हजार ९२९ रुपयांचा खर्च झाले आहेत.