(चिपळूण / इकलाक खान)
शहर विकासासाठी भरभक्कम निधी आणि अन्य समस्या निकाली काढण्याच्या अश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवून शिंदे गटात अर्थात शिवसेनेत गेलेले चिपळूण मधील माजी नगरसेवक अल्पावधीतच नाराज असल्याची चर्चा आहे. एकही मागणी मान्य न झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला असून इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाल्याचे उघडपणे सांगितले जात आहे.
शिवसेनेत उभी फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर घरोबा करत मुख्यमंत्री पद देखील मिळवले. पुढे आपला गटच खरी शिवसेना असा दावा करत त्यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हे देखील मिळवले. साहजिकच महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी त्याचे पडसाद उमटू लागले. अनेकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. चिपळूणमध्ये देखील मूळ ठाकरे यांची शिवसेना तसेच अन्य पक्षातील मंडळींनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून नवीन चूल मांडली.
त्यामध्ये चिपळूण नगरपरिषदेचे काही माजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे. त्या माजी नगरसेवकांनी प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आगामी नगरपरिषद निवडणुका पाहता चिपळूण शहर विकासासाठी निधीची मागणी केली होती. तसेच शहरातील ब्लु लाईन-रेड लाईन रद्द करणे, चिपळूण विकास आराखडा रद्द करणे आणि येथील गाळ उपसा व एन्रॉन पुलासाठी निधी उपलब्ध करून देणे आशा मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या.
चिपळूणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही.लागेल तितका निधी दिला जाईल, प्रस्ताव पाठवा तसेच अन्य विषयाबाबत बैठक घेऊन मार्ग काढला जाईल असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. या अश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवून आणि शहर विकासासाठी सुमारे शंभर कोटी हुन अधिक निधी मिळेल व आगामी निवडणूक सोपी होईल अशेपोटी माजी नगरसेवकांसह अनेकांनी त्यावेळी शिंदे गटात प्रवेश केला होता.आपल्या सर्व मागण्या लवकरच पूर्ण होतील असा ठाम विश्वास त्यांना होता.
मात्र महिन्यामागून महिने उलटले तरी अद्याही एक ही मागणी पूर्ण झालेली नसल्याचे काही नगरसेवकांचे म्हणणे असून त्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ना विकास निधी मिळाला, ना अन्य विषयाबाबत कोणती बैठक झाली. किमान शहर विकासासाठीची निधीची मागणी तरी पूर्ण होणे आवश्यक होते.त्यालाही कुठे मृतरुप येताना दिसत नसल्याने आता भ्रमनिरास होताना दिसत आहे.त्यामुळे शिंदे गटात गेलेल्या त्या काही माजी नगरसेवकांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाल्याची चर्चा उघडपणे ऐकण्यास मिळत आहे.