(संगलट-खेड / इक्बाल जमादार )
गुहागर तालुका शिवसेना पदाधिका-यांच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थितीत रविवार दि. ८ जुलै रोजी करण्यात आलेले आहे. यावेळी ते अनेक गावांना भेटी देवून सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्याही भेटी होणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख बाबू कनगुटकर व अरविंद चव्हाण यांनी दिली.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षसंघटना वाढीसाठी व संघटन मजबुतीसाठी जिल्हाप्रमुखांचा हा दौरा महत्वाचा मानला जात असून गुहागर तालुक्यातील महत्वाचे पदाधिकारी आपल्या सहका-यासह या बैठकीचे नियोजन करीत आहेत. लवकरच शिवसेना नेते रामदासभाई कदम व पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या दौ-याचे आयोजन गुहागरमध्ये करण्यात येणार असून यावेळी अनेक सरपंच व कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार असून उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के तालुकाप्रमुख दिपक उर्फ बाबू कनगुटकर, संघटक प्रल्हाद विचारे नारायण गुरव व त्यांचे सहकारी गाव निहाय दौरे करुन याबाबत ग्रामस्थ व पदाधिका-यांशी संपर्क करीत आहेत.
गुहागरमध्ये लवकरच मोठया मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून नवीन पदाधिकारी नियुक्ती करणे, महिला आघाडी, युवासेना पदाधिका-यांच्या नियुक्ती करण्याचे कामही यावेळी करण्यात येणार असल्याचे माहिती दिपक कनगुटकर यांनी दिली. रामदासभाई कदम व शशिकांत चव्हाणांसोबत काम केलेले सर्वच सहकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गुहागर तालुक्यातील गावच्या गावे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असून यावेळी नगरपंचायत व जि.प.पं.स. निवडणुकांची चाचपणी करताना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचाही आढावा यावेळी घेण्यात येणार असून रिक्त पदांची नियुक्तीही यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुखांनी दिली आहे.