(मुंबई)
ईडीच्या भितीपोटी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेमध्ये बंड झाल्याचा आरोप होत असताना आमदारांच्या मागे लागलेली ईडीची पीडा अद्याप टळलेली नसल्याचे दिसत आहे. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना एनएसईएल घोटाळ्या प्रकरणी गुरुवारी मोठा धक्का बसला आहे. सक्त वसुली संचालनालयाने त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि ११ कोटींची मालमत्ता ईडी सील केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीनं या संपत्तीवर तात्पुरती जप्ती आणली होती. मात्र आता संपूर्ण तपासानंतर या संपत्तीचा ताबा घेण्याचा ईडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
२०१३ मध्ये एनएसईएल घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली. या प्रकरणात संचालकांसह २५ जणांविरोधात मनी लाँंिड्रग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यातील गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतक कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरल्याचे निष्पन्न झाले होते. जवळपास १३००० गुंतवणुकदारांच्या ५६०० कोटींच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचा हा आरोप आहे.