मनिषा कायंदे यांच्यासह मुंबईतील तीन नगरसेवक आणि माजी आमदार तुकाराम कातेही शिंदेंच्या सेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे शिंदेंकडून ठाकरेंना हा मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेच्या वर्धापण दिनाच्या सोहळ्याला आमदार मनीषा कायंदे यांनी दांडी मारली होती.
महिलांवरील अत्याचार, महिलांना आरक्षण, महिलांच्या रेल्वे प्रवासाच्या समस्या आदी मुद्द्यांवर कायंदे यांनी सातत्याने आंदोलने केली होती. आता त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळं शिंदे गटाचं विधानपरिषदेतील संख्याबळ दोनवर पोहोचलं आहे.
आमदार मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने ठाकरे गटाला मुंबईसह नाशिकमध्ये मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला शिंदे गट मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
आमदार मनीषा कायंदे यांच्या पक्षांतरावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. कचरा इकडे तिकडे उडत असतो. तो कचरा हवेचा झोका बदलल्यानंतर आमच्या दारात येऊन पडतो. त्यामुळं त्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही, असं म्हणत राऊतांनी मनीषा कायंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
माननीय मुख्यमंत्र्यांची ओरिजनल शिवसेना आहे, अधिकृत शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मी आहे, यापुढेही काम करत राहीन, असे मनिषा कायंदे म्हणाल्या. मी २०१२ मध्ये पक्षात प्रवेश केला. मी विधानपरिषद आमदार झाले, प्रवक्ता झाले. सभागृहात असेल, सभागृहाबाहेर असेन मी पक्षाचे काम केले. एकनाथ शिंदे यांनी मलादेखील वेळोवेळी सहकार्य केले. मला विधानपरिषदेत संधी दिल्याबद्दल मी पक्षप्रमुखांचे आभार मानलेले आहेतच, असेही कायंदे म्हणाल्या.
हे सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार काम करत आहे. लोकांनी नावे ठेवली. पण एकनाथ शिंदे यांनी कामातून उत्तर दिले. महाराष्ट्रात झपाट्याने काम सुरु आहे. जे प्रकल्प तीन तीन वर्ष थांबले होते. मेट्रो प्रकल्प असेल, समृद्धी महामार्गाचे काम झाले. संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय देखील झाला. उद्धव ठाकरे यांनी वर्षभरात पक्षबांधणीचे काम केले नाही.
मनीषा कायंदेंनी शिंदेंच धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केवळ सकाळी उठून थुकरटवाडी बघण्यासाठी लोकं TV बघत नाही. सकाळी उठून आमच्या देव देवतांचे अपमान करणारे, देवी बसली म्हणून खिल्ली उडवणारे असे लोकं हिंदुत्वाचा आणि शिवसेनाचा चेहरा कसा, बाळासाहेबांची ही शिवसेना आहे का? मला काम करायचे आहे केवळ सकाळी उठून काहीतरी बोलायचे आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा आवाज बनायचे. मला काम करायचे आहे. कोणीतरी म्हणाले की, १ वर्षाने टर्म संपणार आहे. शिवसैनिक म्हणून कधीही टर्म संपत नाही असे म्हणत कायंदेंनी संजय राऊतांना खडेबोल सुनावले आहेत.