(संगलट / वार्ताहर)
ब्रह्मनिष्ठ गुणीराज हैबती घराण्यातील गुरुवर्य ह. भ. प. श्री. दत्ताराम महाराज आयरे यांचे शिष्य तसेच कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूणचे सहसचिव शक्तिवाले शाहिर श्री.विनायक पडवळ मु. मेटे ता. खेड यांना लोककलेतील सुरभी गौरव भूषण पुरस्कार प्राप्त झाला असून सुरभी सांस्कृतिक एवं सामाजिक युवा संगठन आणि आशिष पाटील युवा मंच कोल्हापूर यांच्या वतीने पन्हाळा, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ४१ वा पश्चिम महाराष्ट्र शाहिरी महोत्सव अर्थात सुरभी महाराष्ट्र लोकधारा या महोत्सवात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
या महोत्सवात प्रा.श्री.आनंद गिरी यांच्या संकल्पनेतून गाव कुसाचे सोबती या कार्यक्रमांतर्गत कोकणची लोककला शक्ति-तुरा सादर करण्याची संधी देखील शाहिर श्री. विनायक पडवळ यांना देण्यात आली. या महोत्सवात महाराष्ट्रातून अनेक शाहिर लोककलाकारांनी आपली कला सादर केली. मात्र कोकणच्या मातीतील आपल्या शक्तितुरा या कलेनं रसिकांचं मनोरंजन करत आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला.
गेल्यावर्षी कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या आंबा पर्यटन महोत्सवात देखील शाहिर श्री विनायक पडवळ यांनी आपली कोकणची लोककला शक्ती-तुरा सादर करून रसिकांची वाहवा मिळवली होती. शाहिर श्री.विनायक पडवळ हे गेली २५ वर्षे ही कला जोपासत असून आपल्या लेखणीतून रसिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करत आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शाहिर वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.