(मुंबई)
राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे, त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन (स्टायफंड) देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, देशात मागील काही वर्षात औद्योगिक, कॉर्पोरेट अशा विविध क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. त्या बदलांना अनुसरून विविध कौशल्ये असलेले रोजगार या क्षेत्रामध्ये व्यापक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. पण या कौशल्याचे प्रशिक्षण कोठे घ्यायचे, त्यासाठीच्या प्रशिक्षण संस्था कुठे आहेत, प्रवेशप्रक्रिया कशी असते याची माहिती ज्ञान अनेकांना नसते. त्यामुळे अनेक युवक-युवती पारंपरिक शिक्षण, प्रशिक्षणच घेताना दिसतात.
या युवकांसाठी भविष्याची विविध नवीन क्षितिजे खुली व्हावीत, नवनवे अभ्यासक्रम, स्किल्स त्यांना माहीत व्हावेत यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात दि. 6 मे ते 6 जून 2023 पर्यंत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन केले जाणार आहे. राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे आणि बदलत्या काळास अनुसरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.