रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संदर्भात शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे आढावा बैठक घेतली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, शासकीय तंत्रनिकेतन चे दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्राचार्य ए.एम. जाधव, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता वीणा पुजारी, शाखा अभियंता जनक धोत्रेकर, जॉईन्ट डायरेक्टर नाईक आदी तसेच संचालक डॉ. अभय वाघ, सहसचिव धालवलकर उपस्थित होते.
सामंत यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाचा आढावा यावेळी घेतला. शासकीय इमारत, पदनिर्मिती, अंतर्गत रस्ते, साधनसामुग्री खरेदी आदी संदर्भात कार्यवाही बाबतची माहिती घेतली.
सामंत यांनी यावेळी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अडीअडचणी जाणून घेतल्या. कंत्राटी पद्धतीने कामावर असणाऱ्या सफाई कामगार, माळी, सुरक्षारक्षक यांना देण्यात येणारा पगार हा दैनंदिन वेतन व विशेष भत्ता एकूण मिळून अशाप्रकारे नियमानुसार देण्यात यावा व तसेच त्यांचे एप्रिल 2021 ते आतापर्यंतचे वेतन देखील त्यांना तात्काळ देण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कंत्राटी सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, माळी यांच्या वेतना संदर्भात संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घ्यावा असे निर्देश सामंत यांनी यावेळी दिले. तसेच ज्या ठेकेदाराने नियमापेक्षा कमी वेतन रक्कम कामगारांना अदा केली असल्यास त्यांच्याकडून सदरची रक्कम वसूल करून संबंधितांना देण्याबाबतची कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सांमत यांनी शासकीय अध्यापक महाविद्यालय,बोर्डींग रोड, रत्नागिरी येथे रत्नागिरी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, उपकेंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र बांधकाम याबाबतचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योस्त्ना ठाकूर, यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे किरण हिरे, अधीक्षक अभियंता छाया नाईक, आदि मान्यंवर उपस्थित होते.
तसेच त्यांनी अरिहंत मॉल येथील कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, उपकेंद्र, रत्नागिरी कामांचा आढावा घेतला. यावेळी संचालक डॉ. दिनकर, मराठे, अधीक्षक अभियंता छाया नाईक, रत्नागिरीचे मुख्याधिकारी. बाबर आदि मान्यवर उपस्थित होते.
०००