(रत्नागिरी)
रत्नागिरी शहर पोलिसांनी बाजारपेठ चर्चरोड येथील एका शाळेच्या आवारात गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी गांजासह पकडल्यानंतर या संशयिताने आपल्याजवळचा चाकू काढून स्वत:लाच इजा करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी सावधगिरीने तो चाकू काढून घेतला.फईम नूरमहंमद खडकवाले (वय ४३, रा. बाजारपेठ) असे या व्यक्तीचे नाव आहे. या ठिकाणी आलेल्या चरसी ग्राहकांना देखील पोलिसांनी चांगला हींगा दाखवत पांगवले.
शहर पोलिसांना काही दिवसांपुर्वी बाजारपेठेतील चर्चजवळच्या शाळेच्या आवारात गांजा या अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. काही दिवस याठिकाणी पाळत ठेवून खात्री पटल्यानंतर सापळा लावण्यात आला. गांजा विक्री करणारा आरोपी आपल्या दुचाकीवरून त्याठिकाणी आला असता दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडुन अटक केली. यावेळी फईमच्या खिशात आणि दुचाकीच्या डिकीत गांजा मिळाला. गांजाच्या २३ पुड्यांसह दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या सर्व मुद्देमालाची किंमत ९० हजार इतकी आहे.
गेले काही दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. मुसळधार पावसात देखील पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली मात्र याची कोणालाच कुणकूण नव्हती. गांजा खरेदीसाठी येणारे ग्राहक बिनधास्तपणे येत होते. या ग्राहकांचीही पोलिसांनी चांगलीच नशा उतरवली. जिल्ह्यात पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना लक्ष्य केले आहे. गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी कारवाई केली जात असल्याने पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि त्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.