( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी शहरातील शाळांमध्ये वाटप होत असलेला शालेय पोषण आहार निकृष्ठ असल्याचे पुढे आल्यानंतर आता याची गंभीर दखल जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी घेतली आहे. संबंधित आहाराची तपासणी करण्यासोबत निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत, तर संबंधित ठेकेदाराला नोटिसा बजाविण्यात आल्या असून तीन नोटीस दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केला जाणार आहे. त्याचबरोबर या संपूर्ण टेंडर प्रकियेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.
शहरातील शिर्के प्रशाला, दामले हायस्कूलमध्ये पोषण आहारात अनियमितता आढळून आली, इतकेच नव्हे तर कच्चा पोषण आहार दिला गेला. सलग तिसन्या दिवशीही पोषण आहार व्यवस्थित आला नव्हता. पाण्यासारखी आमटी आणि मऊ भात विद्यार्थ्यांना दिला गेला, शाळांकडूनही तक्रारी अहवाल मागविण्यात आले आहेत, त्यामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असेल, तर योग्य निर्णय घेण्यात येईल, ठेकेदाराला नोटीस बजाविण्यात आली आहे. नोटीस बजावूनही सुधारणा होत नसेल, तर तीन नोटिसानंतर ठेका रद्द केला जाईल, असे स्पष्ट मत इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केले.
ज्या संस्थेला टेंडर मिळाले आहे. त्या तीनही संस्था जिल्ह्याबाहेरील असून यामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळाले नाही डिपॉझिटची रक्कम अधिक असल्याने स्थानिक बचतगटाला ही रक्कम भरता आली नाही. परंतु त्यानंतर डिपॉझिटची रक्कम कमी केल्याची माहिती पुढे आली आहे. ही टेंडर विभागून देण्यात आले. या संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी जिल्हा सर्वशिक्षण विभाग व नगर परिषदेला देणार असल्याचे सांगीतले.
यापूर्वी स्थानिक बचतगटाच्या महिला शाळांमधून जाऊन अन्न शिजवून गरमागरम सकस आहार मुलांना देत होते, आता मात्र नियमावली बदलल्यानंतर यात अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी शाळांमधून देण्यात आल्या आहेत. अनेक विद्यार्थी आता घरातूनच डबे घेऊन येत असून निकृष्ट पोषण आहार खाण्यास नकार देत आहेत. या पार्श्वभूमीवर पोषण आहार विषयात आपण लक्ष घातले असल्याचेही दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.