(मुंबई)
शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला होता. मात्र नाट्यमय घडामोडीनंतर राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय त्यांनी रद्द केला आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी राज्यातील अनेक शहरांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राष्ट्रवादीचं कुटुंब असून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल तसेच शरद पवारांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन येणाऱ्या काळात सर्वांनी अधिक जबाबदारी उचलावी, असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावं पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा तसेच विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम रहावं, असा आग्रह धरत निवड समितीने त्यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावण्याचा निर्णय एकमताने घेतला, त्यामुळं मी निवड समितीच्या आणि शरद पवारांच्या निर्णयाचं स्वागत करतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवारांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमानं पक्षाच्या कामाला लागलो आहोत.