(मुंबई)
बारसू रिफायनरी प्रकल्प विषयात शरद पवारांनी लक्ष घातल्यानंतर आंदोलनकर्ते नेते सत्यजित चव्हाण यांनी पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेट घेतली. त्यानंतर आता शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांचे भेट घेतली आहे. या सगळ्या भेटीगाठींमधून शिंदे – फडणवीस सरकारचा प्रकल्पाच्या विरोधातली हवा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत शरद पवारांनी सावध भूमिका घेतली आहे. पण उद्धव ठाकरेंची भूमिका कठोरपणे प्रकल्पाविरोधात विरोधात चालली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना थेट आपल्या अंगावर घेण्यापेक्षा काट्याने काटा काढण्यावर शिंदे – फडणवीस सरकारने भर दिला आहे. यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची फोनवर चर्चा केली आणि उदय सामंत यांना पवारांकडे शिष्टाईसाठी पाठविले.
उदय सामंत यांनी बारसूतील सर्व परिस्थिती पवारांना सांगितली. तिथे सध्या माती परीक्षण सुरू आहे. माती परीक्षण झाल्यानंतर कंपनी शास्त्रीय आधारावर तिथे प्रकल्प सुरू करायचा किंवा नाही याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार कुठलाच निर्णय ताबडतोब होणे शक्य नाही, याची उदय सामंत यांनी शरद पवारांना कल्पना दिली. ही माहिती स्वतः उदय सामंत यांनीच पवारांच्या भेटीनंतर पत्रकारांना दिली.
उद्धव ठाकरे यांची प्रकल्पाबाबतची ताठर भूमिका लक्षात घेता त्यांच्याशी कुठल्या चर्चा अथवा वाटाघाटी करण्यापेक्षा शिंदे – फडणवीस सरकारने शरद पवारांनाच हाताशी धरून उद्धव ठाकरे यांची प्रकल्पाच्या विरोधातली हवा काढून विरोध सौम्य करून हा प्रकल्प पुढे रेटण्यासाठी काट्याने काटा काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या ज्या शंका असतील त्या दूर केल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणार नाही, हा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला दिला होता आणि या मुद्द्यावरच शरद पवारांसोबत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या काही शंका असतील तर, त्या कशापद्धतीने दूर करता येईल, याबाबत चर्चा झाली. तसेच, शेतकऱ्यांवर अन्याय करून, शेतकऱ्यांची चर्चा न करता हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही, असा शब्द मी सरकारच्यावतीने शरद पवार यांना दिला, असेही उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, बारसु रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सरकार स्थानिकांशी, आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे. त्यामुळे जोर-जबरदस्ती केली जाणार नाही. सध्या त्या ठिकाणी माती परिक्षण सुरू आहे. त्यानंतर कंपनी ठरवणार आहे की, ही जागा प्रकल्पासाठी योग्य आहे की नाही? याबाबत अधिकची माहिती आपण शरद पवार यांना दिल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.