(जीवन साधना)
ज्योतिषशास्त्रात शनी हा अतिशय क्रूर ग्रह मानला जातो, त्यामुळे लोक त्यांचे नाव ऐकताच घाबरतात. न्यायदेवता शनी प्रत्येकाला त्यांच्या कर्मांच्या आधारावर शुभ-अशुभ प्रभाव देतात. ज्याचे जसे कर्म असते त्याला तसाच न्याय शनी देव देतात. शनी देवाला कर्मदाता असेही म्हणतात. जर कुंडलीत शनी शुभ स्थितीत बसला असेल तर तो सर्वसाधारण माणसाला राजाही बनवतो. ज्यांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे त्यांनी काही उपाय, जीवनशैली बदलल्यास शनीचे अशुभ प्रभाव देखील शुभ प्रभावांमध्ये बदलले जाऊ शकतात.
हिंदू धर्म प्रथांमध्ये दंडाधिकारी मानण्यात आलेल्या शनीदेवाचे चरित्रसुद्धा कर्म आणि सत्य जीवनात अवलंब करण्याची प्रेरणा देते. शनी देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी शनी पूजा आणि उपासना शुभ मानण्यात आली आहे. शनी उपासनेने दुःख, कलह, अपयश दूर होऊन सुख, सौभाग्य, यश प्राप्त होते. धर्मशास्त्र आणि ज्योतिष मान्यतेमध्ये शनी पिडा, कुंडलीत शनीची महादशा, साडेसातीमध्ये शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी शनी पूजेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक धार्मिक कर्माचे फळ तेव्हाच मिळते, जेव्हा त्याचे पालन विधिव्रत पद्धतीने केले जाते.
जर आपल्याला शनीच्या अशुभ प्रभावांचा सामना करावा लागत असेल तर हे उपाय अवश्य करा.
- शनी दोष कमी करण्यासाठी शनिवारी काळ्या वस्तू दान कराव्यात, असं ज्योतिषशास्त्रात सुचवलं जाते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाचे ब्लँकेट, छत्री दान करणे शुभ मानले जाते. याशिवाय काळ्या चपला गोरगरीब लोकांना दान करणे चांगले मानतात. शनिवारी मोहरीचे तेल आणि काळे उडीद दान करणे शुभ असते. याशिवाय मोहरीचे तेल अर्पण करुन दान दिल्याने शनीदेव प्रसन्न होतात, असेही मानले जाते.
- सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपले विस्कटलेले केस भांग पाडून व्यवस्थित करा, झोपेतून उठल्यावर पांघरूण नीट घडी घालून ठेवा बेड स्वच्छ करा. ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आलं की जे लोक दातांनी नखं खातात त्यांच्यावर शनीदेव नाराज होतात.
- अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान करा
- स्नानानंतर देवापाशी उदबत्ती, निरांजन लावून आपल्याला आवडेल तो शनी देवांचा मंत्र १०८ वेळा जपा
- आंघोळ झाल्यावर सकाळी आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींच्या पाया पडा कारण ही मंडळी प्रत्यक्ष शनी देवांचे प्रतीक मानली जातात. त्यांनी दिलेले आशीर्वाद म्हणजे शनी देवांचे आशीर्वाद असतात त्यांना कधीही दुखवू नका
- आपल्या घरातील/ऑफीस मधील नोकर/कर्मचारी यांच्याशी सौजन्याने वागा
- दर शनिवारी भिकारी, अपंग, कुष्ठरोगी यांना ऐपतीप्रमाणे भोजन व दक्षिणा द्या, त्यांची अवहेलना करू नका.
- जो खरोखरच गरजू आहे त्याला पादत्राणे दान द्या. गरजू व्यक्तीला निळे वस्त्र / शर्ट दान द्या.
- एका कोऱ्या कागदात मीठ घेऊन त्यात एक लोखंडी खिळा मिठात बुडेल असा ठेऊन त्याची पुडी बांधा व ती पुडी पिंपळाच्या झाडा खाली ठेऊन द्या. हा उपाय शनिवारी करा.
- शनी देवांचे दर्शन कधीही त्याच्या समोर उभे राहून घेऊ नका. त्यांचे दर्शन नेहमी तिरके घ्या. कारण शनी देवांच्या दृष्टीत दोष आहे. त्यांची दृष्टी ज्यावर पडते त्याचा ते चकानाचूर करतात
- श्री काळभैरव हे शनी देवांचे आराध्य दैवत आहे आपण श्री काळभैरवांची सेवा करून शनी देवांची कृपा प्राप्त करू शकता. पण त्यासाठी तुमची बाजू सत्याची व न्यायाची हवी, तरच श्री काळ भैरव तुमच्या पाठीशी उभे राहतील. शनिदेवाला न्यायाची देवता म्हटलं जातं. जे लोक सत्य आणि न्यायाची साथ देतात, त्या लोकांवर शनिदेवाची कृपा नेहमी राहाते.
- शनिवारच्या दिवशी लोखंडाचं सामान चुकूनही खरेदी करु नका. मान्यतेनुसार, असं केल्याने शनिदेव नाराज होतात. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी मीठ खरेदी करु नये. मान्यता आहे की मीठ खरेदी केल्याने कर्ज वाढतं. कर्जापासून वाचण्यासाठी शनिवारी मीठ खरेदी करु नका.
- सत्य, प्रामाणिकपणा व न्याय या वाटेवर आपले चालणं असल्यास शनी देवांसारखा दाता कोणी नाही, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे.