(मुंबई)
सायबर गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवून सर्वसामान्यांच्या पैशांवर ऑनलाइन आर्थिक फसवणूक करीत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘न्यू पिंक व्हॉट्सॲप’ लिंक सायबर भामट्यांकडून व्हायरल केली जात आहे. या लिंकवर क्लिक करताच व्हॉट्स अॅपचा नवा गुलाबी लुक अधिक वैशिष्ट्यांसह तुम्हाला मिळेल, असे आमिष दाखवले जाते. मात्र क्लिक केल्यास मोबाइलमधील डाटा हॅक होऊ शकतो. या लिंकच्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
केंद्र सरकारने या अॅपसंदर्भात अलिकडेच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘न्यू पिंक व्हॉट्सॲप’ लिंक सायबर भामट्यांकडून व्हायरल केली जात आहे. या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक होऊ शकतो. अँड्रॉइड यूजर्सना व्हॉट्स अॅपचे अधिकृत अपडेट म्हणून एक बनावट लिंक पाठवण्यात येते. ही लिंक क्लिक केल्यास एक घातक सॉफ्टवेअर मोबाइल फोनमध्ये इन्स्टॉल होते. यामुळे या फोनमध्ये व्हायरस शिरतोच, शिवाय या युजरला व्हॉट्स अॅपमार्फत संपर्क करणाऱ्या अन्य यूजर्सच्या मोबाइलमध्येही हा व्हायरस शिरू शकतो. मोबाइलमधील ओटीपी, संपर्क, छायाचित्रे आणि अन्य माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकते.
केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारेच पोलिसांनी नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. मोबाईलमध्ये असा फेक अॅप असेल तर तो तत्काळ अनइन्स्टॉल करा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.