(राजापूर/प्रतिनीधी)
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा मुलाखत देतानाचा एक फोटो व्हॉटस्अप ग्रुपवर व्हायरल करण्यात आला आहे. सदर फोटो व्हायरल करताना त्याखाली बदनामीकारक अशा मजकूरचा उल्लेख करण्यात आला आहे. ही घटना राजापूर तालुक्यात घडली असून अशाप्रकारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा अपमानकारक उल्लेख करून बदनामी करणाऱ्या विरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) संयोजक अनिलकुमार करंगुटकर यांनी पोलीस निरीक्षक, राजापूर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी राजापूर पोलीस स्थानकात सादर केले आहे.
अमृता फडणवीस या माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी असून अशा व्हायरल मेसेजमुळे एका प्रतिष्ठित महिलेची बदनामी करण्यात आली आहे. हा मेसेज ‘राजापूरचे मावळे’ या व्हॉटस् अॅप ग्रुपवर दि.०९/०७/२०२२ रोजी रात्री १०.१८ वाजता अशफाक मापारी नामक व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून पाठविला आहे, असे अनिलकुमार करंगुटकर यांनी पोलीस निरीक्षक, राजापूर यांना सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे.
त्याबाबतचे पुरावेही त्यांनी या पत्रासोबत जोडले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नीची व्हॉटस् अॅप ग्रुपद्वारे अशाप्रकारे मेसेज व्हायरल करून बदनामी करणाऱ्यावर योग्य ती कारवाई त्वरीत करावी, अशी मागणी श्री.करंगुटकर यांनी पोलीस निरीक्षक, राजापूर यांच्याकडे केली आहे.