(संगमेश्वर /प्रतिनिधी )
शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे ३९ वर्षे सेवा करणारे विनायक पाध्ये हे विद्यार्थ्यांवर सदैव मोलाचे संस्कार करत आले . संस्कारांसोबत त्यांनी संस्कृती देखील शिकवली . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची स्वप्ने दाखविण्याचे काम त्यांनी सातत्याने केल्याने पाध्ये हे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले गेले . आज शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांना घेण्यासारखा असल्याचे प्रतिपादन व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी केले .
संगमेश्वर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विनायक उर्फ विनोद पाध्ये आज पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात ३९ वर्षांची सेवा करुन नियत वयोमानानुसार निवृत्त होत असल्याने व्यापारी पैसा फंड संस्था , पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि प्रशालेच्या कला विभागातर्फे पाध्ये यांचा संस्था सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते शाल श्रीफळ , पुष्पगुच्छ , सन्मानचिन्ह , एक पुस्तक आणि चित्रकार विष्णू परीट यांनी रेखाटलेली जलरंगांतील एक कलाकृती देवून सन्मान करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे , शिक्षक विनोद ढोर्लेकर , किशोर घुंगरड आणि दहावी ब च्या वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते .
प्रारंभी मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी उपस्थितींचे स्वागत करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला . यावेळी सत्कारा निमित्त आपले मनोगत व्यक्त करताना विनोद पाध्ये म्हणाले की , सेवा किती वर्षे केली यापेक्षा सेवा कशी केली याला महत्व आहे . आपण नोकरीच्या पहिल्या दिवसापासून आज अखेरच्या दिवसापर्यंत कायम वेळेचे बंधन पाळले . ज्या शाळेत काम केले तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळा परिसर विकासाचे अनेक उपक्रम राबवले . आपण प्रसिध्दी आणि पुरस्कारांपासून कायमच दूर राहिल्याचे पाध्ये यांनी स्पष्ट केले . व्यापारी पैसा फंड संस्थेने आज माझा जो सन्मान केला , तो मला उर्वरित आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरेल असेही पाध्ये यांनी नमूद केले . प्रशालेचे पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले .