(मुंबई)
वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्पाला पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाला पत्र लिहिणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी दिली. घटनाबाह्य शिंदे सरकारच्या निष्काळजीपणामुळे वेदांता फॉक्सकॉनसारखा दीड लाख रोजगार देणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आता वेदांता कंपनीला गुजरातमध्ये गुंतवणूकदार मिळत नाहीत, अशी माहिती आहे. त्यामुळे वेदांताला पुन्हा महाराष्ट्रात यायचे असेल तर शिंदे – फडणवीस सरकारने पुढाकार घेतला पाहिजे असे सांगतानाच आपणही यासंदर्भात वेदांताच्या व्यवस्थापनाला पत्र लिहिणार आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यामुळे वेदांता- फॉक्सकॉनचा जवळपास दीड लाख कोटींचा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येणार का, या चर्चेने सध्या राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. परंतु राज्य सरकार याबाबत काय भूमिका मांडणार, हे पाहणे मात्र महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी २३ जानेवारी रोजी विधानसभेत होत आहे. या समारंभाला आपण जाणार का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यावर निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात येईल. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतील आणि जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे कधीही मागे हटले नाहीत. त्यांनी दिल्लीला झुकवले होते. गद्दार सुरतेला पळून गेल्याने महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचे काम त्यांनी केले आहे. या गद्दारांना कळायला हवे की, यांनी गद्दारी कोणाशी केली आहे. त्यांना थोडी तरी लाज वाटायला हवी. त्यांनी कोणाच्या घराला संपवायचा प्रयत्न केला हे त्यांना कळायला हवे, असा हल्ला आदित्य ठाकरे यांनी यावेळी चढवला.