(गुहागर)
गुहागर तालुक्यातील आबलोली पागडेवाडी येथे १९ वर्षीय तरुणीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने उपचारा दरम्यान तिचा कोल्हापूर येथे मृत्यू झाल्याची माहिती कोल्हापूर सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रतीक शिंदे यांनी गुहागर पोलिसांना दिली. सानिका राजेंद्र पागडे (१९, आबलोली, गुहागर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सानिका हिने अज्ञात कारणावरून १२ एप्रिल रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते. तिला उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान तिचा कोल्हापूर येथे मृत्यू झाला. डॉक्टरांनी याची खबर गुहागर पोलिस स्थानकात दिल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.