(पुणे)
पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या पोलीस कोठडीत चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवाजी उत्तम गरड असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. युनिट सहाच्या पथकाने त्याला हडपसर परिसरातील एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. ही घटना पहाटे ६ च्या सुमारास उघडकीस आली.
वाहनचोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने शिवाजी गरड याला १२ मे रोजी अटक केली होती. तपासानंतर त्याला काल रात्री विश्रामबाग पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. आरोपीला पांघरुणासाठी दिलेल्या चादरीचा काठ कापून त्याच्या साहाय्याने तेथील जाळीला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पहाटेच्या सुमारास बराच वेळ झाला तरी शिवाजी गरड बाहेर आला नाही. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी खिडकीतून पाहिले असता शिवाजी गरड याने चादरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिवाजी गरड याला रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले.