(रत्नागिरी)
अज्ञात कारणातून विवाहितेला, तिच्या बहिणीला व पतीला हातांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीची ही घटना रविवार २१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता हातखंबा तिठा येथे घडली. याप्रकरणी विवाहितेचा पती समीर सिताराम शिवगण, तिची नणंद पुनम प्रकाश भायजे आणि तिचा मुलगा ऋषीकेश प्रकाश भायजे या तिघांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात पिडीतेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानूसार , पिडीता गेल्या १ वर्षापासून पतीच्या त्रासाला कंटाळून विभक्त रहातात.रविवार २१ रोजी पिडीता हातखंबा तिठा येथे आंबा विक्री करत असताना तिचा पती समीरने तिथे येउन दारुच्या नशेत तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा पिडीतेने शिवीगाळ करण्याचे कारण विचारल्याच्या रागातून समीरने तिला हातांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा बाजुलाच आंबा विक्री करणारी पिडीतेची बहिण समीक्षा कोरगावकर आणि तिचा पती समिर कोरगावकर हे पिडीतेचा पती समीर शिवगणला अडवण्यासाठी मध्ये पडले. तेव्ढ्यात पिडीतेची नणंद पुनम भायजे आणि तिचा मुलगा ऋषीकेश भायजे यांनी तिथे येउन पिडीतेसह तिच्या बहिणीला आणि तिच्या पतीला हातांच्या थापटांनी मारहाण केली. यात पिडीता रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्याला मुका मार बसला.
दरम्यान, आजुबाजुच्या नागरिकांनी त्यांचे भांडण सोडवले असता पिडीतेचा पती समीर तिथून निघून गेला. काही वेळाने तो पुन्हा लोखंडी रॉड घेउन तिथे आला आणि त्याने पुन्हा तिघांनाही रॉडने मारहाण केली. याप्रकरणी तिघांवरही ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.