(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील फगरवठार येथून बेपत्ता झालेल्या तन्वी रितेश घाणेकर (३३) या विवाहितेच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदन अहवालावरुनच स्पष्ट होणार असून तिच्या मोबाईलचाही शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वा. ती मुलगी आनंदी हिला मी बाजारात जावून येते. उशिर झाला तर जेवण करुन घ्या, असे सांगून तन्वी दुचाकी (एमएच ०८ एक्स ७११६) वरुन बाजारात गेली होती. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ती घरी न परतल्याने पती रितेशन ३० सप्टेंबरला शहर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची खबर दिली होती.
वेपत्ता झाल्यानंतर तब्बल चार दिवसांनी सोमवारी सायंकाळी छिन्नविछिन्न अवस्थेत तिचा मृतदेह भगवती किल्ला येथील ‘कडेलोट’ पॉईंटखाली २०० फूट खोल दरीत आढळून आला होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली की घातपात झाला हे आता शवविच्छेदन अहवालावरुनच स्पष्ट होणार आहे. जिल्हा रुग्णालयातून अध्याप शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने पोलीसांनी अंतिम निकर्ष काढलेला नाही. तसेच तन्वी घाणेकर यांच्या मोबाईला शोध सुरुच असून मोबाईलचे अंतिम लोकेशन कोळंबे असल्याने पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरु केला आहे. तब्बल चार दिवसांनी तन्वीचा मृतदेह आढळून आल्याने त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता तर शरीराचा काही भाग कुजून गेला होता. परंतु, कपड्यांवरुन तिच्या पतीने तिला ओळखले होते. उत्तरीय तपासणीनंतर तन्वीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता.