(पुणे)
सुनेला नीट स्वयंपाक करता येत नाही म्हणून मानसिक व शारीरीक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कारागृह पोलीस हवालदारासह तिघांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस हवालदार माणिक भवार, बाळू भवार, शाहाबाई भवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आश्विनी बाळु भवार (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत अश्विनीची आई सुनंदा परमेश्वर पवार (वय ४७, रा. पवडुऴ जि. बीड) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५२८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती, सासू, सासरे व दीरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१५ पासून २८ जुलै २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिक भवार हे येरवडा कारागृहात हवालदार असून नियुक्तीला असून
जेल वसाहतीत राहतात. त्यांचा मुलगा बाळु आणि आश्विनी यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. आश्विनी हिला किरकोळ कारणावरुन मारहाण व शिवीगाळ केली जात. तुला नीट स्वंयपाक करता येत नाही़, भांडी पण घासता येत नाहीत, असे म्हणून वारंवार शिवीगाळ करुन तिचा मानसिक व शारीरीक छळ केला जात होता.
या छळाला कंटाळून आश्विनी हिने जेल वसाहतीत २८ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत.