( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी शहर पोलीस ठाणेच्या गुन्हे शाखेतील अंमलदार विलास जाधव यांनी उत्कृष्ट गुन्हे तपास व गुन्हे शाबित केल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचां गौरव केला आहे.
गुंतागुंतीचा तपास करताना पोलिसांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच बाहेर राज्यातील गुन्हेगारांना, खुनातील आरोपींना अटक करताना वेगवेगळ्या राज्यात जिवाची जोखीम पत्करून जावे लागते. अर्थात सायबर क्राईमचा तपास गुंतागुतीचा असतो. यामधील गुन्ह्यांचे आरोपीही चलाख असतात. परंतु त्यांना रत्नागिरी शहर पोलीस ठाणे पोलीस अंमलदार विलास जाधव यांच्यासारखे अनुभवी पोलीसच बेड्या ठोकत असतात. त्यामुळेच त्यांच्या कामाची पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी दखल घेतली.
पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे मा.पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांचे हस्ते उत्कृष्ट गुन्हे तपास व गुन्हे शाबिति करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये अंमलदार विलास जाधव यांचा वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून चांगली कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला. खुनातील आरोपी, खुनाचा पुरावा नाहीसा करणारे आरोपी, अपघातातील आरोपी यांसारख्या विविध गुन्ह्यातील आरोपींचां शोध घेऊन अटक करण्याची उत्तम कामगिरी केल्याबद्दल मोहित कुमार गर्ग यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला. विलास जाधव हे १५ वर्ष पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध गुन्ह्यांतील आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत. अशाप्रकारची प्रशंसनीय कामगिरीबद्दल विलास जाधव यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.