एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 17 व्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आहे. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना आठ गडी गमावून 256 धावा केल्या आणि विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने तीन विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.
आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने अनेक विक्रमांना गवसणी घातली. बांगलादेशविरुद्ध रोहितने जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्याचे अर्धशतक हुकले. मात्र, ४० चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. या खेळीत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. तो विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या. कर्णधार (पूर्ण सदस्य) म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला. तसेच आशिया खंडात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ हजार धावा पूर्ण केल्या.
विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम
आजच्या सामन्यात रोहितने न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवे आणि मोहम्मद रिझवानला मागे टाकत यंदाच्या वर्ल्डकपमधील आतापर्यंतचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरण्याचा मान मिळवला. रोहित शर्माने वर्ल्डकप २०२३ मधील ४ इनिंगमध्ये ८४.६६ च्या सरासरीने २५४ धावा केल्या आहेत तर डेवॉन कॉनवेने ८३ च्या सरासरीने २४९ आणि मोहम्मद रिझवानने ३ डावात १२४ च्या सरासरीने २४८ धावा केल्या आहेत.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून 256 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 41.3 षटकांत तीन गडी गमावून 261 धावा केल्या आणि सामना जिंकला. विराट कोहलीने षटकार लगावत भारताचा विजय साकार केला. तसेच या षटकारासह त्याने वनडे क्रिकेटमधील 48 वे शतकही पूर्ण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरच्या नावे सर्वाधिक 49 शतकं आहेत आणि या विक्रमापासून कोहली एक शतक मागे आहे.
बांगलादेशच्या 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहलीने 97 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार अन् 4 षटकार लगावले. शुभमन गिलनेही अर्धशतक लगावले. त्याने 55 चेंडूत 5 चौकार अन् 2 षटकारासह 53 धावांची खेळी केली आणि रोहित शर्माने 40 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले. रोहितनं 7 चौकार अन् 2 षटकार लगावले. लोकेश राहुलने 34 चेंडूत 3 चौकार अन् 1 षटकारासह नाबाद 34 धावा केल्या. बांगलादेशकडून गोलंदाजीत मेहदी हसनने दोन आणि हसन महमूदने एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, सलामीवीर फलंदाज लिटन दास आणि टी हसन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 256 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या नझमुल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तनजीद हसन आणि लिटन दास यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये 63 धावा जोडल्या. बांगलादेशची पहिली विकेट 93 धावांवर पडली. तंजिद 43 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. यानंतर कर्णधार नजमुल आठ धावा करून जडेजाचा बळी ठरला. महेदी हसनला तीन धावांवर सिराजने बाद केले. यानंतर लिटन दासही 66 धावा करून जडेजाचा बळी ठरला.
पहिली विकेट 93 धावांवर गमावलेल्या बांगलादेशची धावसंख्या 4 बाद 137 अशी झाली होती. यानंतर मुशफिकूर रहीमने तौहीद हृदयॉयसह डावाची धुरा सांभाळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. शार्दुलने 16 धावांवर तौहीदला बाद केले. रहीमही 38 धावा करून बुमराहचा बळी ठरला. अखेरीस महमुदुल्लाहने 36 चेंडूत 46 धावा करत संघाची धावसंख्या 250 धावांच्या जवळ नेली. शेवटच्या षटकात बुमराहने महमुदुल्लाहला अर्धशतक करू दिले नाही आणि त्याला शानदार यॉर्करवर क्लीन बोल्ड केले. शरीफुलने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बांगलादेशची धावसंख्या 256 धावांपर्यंत नेली.
भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले. शार्दुल आणि कुलदीपला प्रत्येकी एक विकेट मिळाली. या सामन्यात फक्त तीन चेंडू टाकल्यावर हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो पुढे गोलंदाजी करू शकला नाही.
दरम्यान, भारताचा पुढील सामना न्यूझीलंडशी आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर आहेत आणि ते एकमेव संघ आहेत जे आतापर्यंत अपराजित आहेत. अशा परिस्थितीत 22 ऑक्टोबरला होणारा हा सामना खूपच रोमांचक असेल.
तब्बल २७ वर्षांनी झाला पुण्यात विश्वचषकाचा सामना
पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत झाली. मुंबईनंतर पुण्यामध्ये विश्वचषक स्पर्धेचा सामना पार पडला. १९९६ विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद भारताला मिळाले होते. त्यावेळेस पुण्यात वेस्ट इंडीज विरुद्ध केनिया सामना पुण्यामध्ये खेळवला गेला होता. त्यानंतर आज २७ वर्षांनी पुण्यात क्रिकेटच्या महाकुंभाचा सामना खेळवला गेला. यावेळेस मात्र पाच सामन्यांचे आयोजन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन करणार आहे. यापूर्वी उभय संघांत ५० षटकांच्या विश्वचषकात झालेल्या चारपैकी तीन लढती भारताने जिंकल्या. २००७ च्या लढतीत नवख्या बांगलादेशने भारताला धक्का देत पहिल्याच फेरीत भारताला घरी पाठवले होते.
For his scintillating unbeaten century in the chase, Virat Kohli receives the Player of the Match award 🏆#TeamIndia continue their winning run in #CWC23 after a 7-wicket win over Bangladesh 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#INDvBAN | #MenInBlue pic.twitter.com/7AypN7QNhK
— BCCI (@BCCI) October 19, 2023