देशात सध्या कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे, त्यामुळे केंद्र सरकारने विमानतळ, विमानांमध्ये प्रवासी आणि कर्मचारी यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने हा आदेश दिला आहे. मास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल. हा नियम पायलट, हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट यांनाही लागू आहे.
राजधानी दिल्ली, पंजाबमध्येही मास्क सक्ती करण्यात आली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने कोरोना नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालय तसेच इनडोअर आणि आउटडोअर बैठक, मॉल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या समारंभाचे आयोजन करु नका, गर्दी टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.