(कोलंबिया)
कोलंबियाच्या ॲमेझॉनच्या जंगलात १ मे रोजी विमान अपघात झाला होता. मात्र दोन आठवड्यानंतर कोलंबियाच्या घनदाट ॲमेझॉनच्या जंगलात ११ महिन्यांच्या बाळासह चार मुले जिवंत सापडली आहेत. राष्ट्रपती गुस्तावो पेट्रोयांनी बुधवारी सांगितले. ‘हा देशासाठी आनंदाचा क्षण आहे’ पेट्रो यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली. लष्कराच्या शोध मोहिमेनंतर ही मुले सुरक्षितपणे सापडली आहेत.
जंगलात अडकलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरुच होती. या शोध मोहिमेत स्नीफर कुत्र्यांसह १०० हून अधिक सैनिक तैनात केले होते. विमानात ११ महिन्यांचे एक बालक तसेच इतर तीन लहान मुले होती. त्यांचे वय अनुक्रमे १३, ९ आणि ४ वर्षे आहे. विमानाचा अपघात झाल्यापासून ही मुले जंगलात भटकत होती. मुलांना जंगलात लाकडी निवारा मिळाल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी शोध मोहिम तीव्र करण्यात आली. अधिकाऱ्यांना खात्री पटली की मुले अजूनही जिवंत आहेत. सशस्त्र दलांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये जंगलात एका ठिकाणी कात्री आणि हेअरबँड दिसले. एका मुलाची पाण्याची बाटली आणि अर्धवट खाल्लेली फळे सापडली होती. त्यामुळे मुलांना शोधण्यास मदत झाली.
सोमवार आणि मंगळवारी, सैनिकांना पायलट आणि दोन प्रौढांचे मृतदेह सापडले. हे सर्व जण जंगलातील तळावरून सॅन जोझ डेल ग्वाविअरेकडे उड्डाण करत होते, असे समजते. मृत प्रवाशांपैकी एक महिला ही या मुलांची आई होती. त्या मुलांना शोधल्यानंतर मदतीसाठी तीन हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. त्यातील एक हुआटोटो भाषेत मुलांच्या आजीचा रेकॉर्ड केलेला संदेश वाजवत होता. ज्यामध्ये त्यांना जंगलात आहे तिथे थांबण्यास सांगण्यात आले होते, पुढे जाणे बंद करण्यास सांगितले होते.