(नवी दिल्ली)
भारतीय कुस्ती परिषदेतील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. WFI च्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे संजय सिंह अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर साक्षी मलिकने कुस्ती सोडत असल्याची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केला. आता विनेश फोगाटने देखील पुरस्कार वापसीचं पाऊल उचललं आहे. विनेशने खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
विनेशनेही लिहिलं पंतप्रधानांना पत्र
भारतासाठी अनेक पदक जिंकून देणारी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष म्हणून ब्रिज भूषण शरण सिंह यांचे निकवर्तीयच असलेल्या संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर आपले दोन्ही पदक परत करण्याचा निर्णय घेतला. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र लिहित विनेशने त्याला कॅप्शन दिलं की, ‘मी माझा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे. आम्हाला या परिस्थितीत पोहचवणाऱ्या शक्तीशाली व्यक्तीचे खूप खूप आभार’
विनेशने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे विचारले की, मला आठवतंय की 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये साक्षीने पदक जिंकल्यावर तिला तुमच्या सरकारने बेटी बचाओ बेटी पाढाओचा ब्रँड अम्बेसिडर बनवले होते. आज साक्षीला कुस्ती सोडायला लागत आहे. तेव्हापासूनच मला 2016 चं ते वर्ष आठवतंय. फक्त सरकारी जाहिरातीवर छापण्यासाठीच महिला खेळाडू झालो आहोत का?
विनेशला पुरस्कार कधी मिळाले?
विनेश फोगाटला 2016 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2020 मध्ये तिला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार मिळाला. खेल रत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुरस्कार मिळाला त्यावेळी विनेशला दुखापत झाली होती. ती व्हीलचेअरवरून पुरस्कार घेण्यासाठी आली होती.