(राजापूर)
इतर मागास वर्ग समितीचे प्रमुख आमदार मंगेश कुडाळकर यांचे शासकीय स्वीय सहाय्यक आणि विधानभवनातील अधिकारी राजेंद्र भानजी यांचा नुकताच श्रीदेव वेतोबा ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबा देवस्थानला ‘ब ‘वर्ग प्राप्त होण्यासाठी भानजी यांनी विशेष प्रयत्न व पाठपुरावा केला होता .
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा देण्यासाठी प्राप्त प्रस्ताव राज्य निकष समितीच्या समोर 4 नोव्हेंबर 2022 च्या बैठकीत सादर करण्यात आले होते. सदर समितीने निकषाप्रमाणे तपासणी केल्यानंतर आरवली येथील श्री देव वेतोबा देवस्थानला ‘ब ‘वर्ग दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ब वर्ग दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
आरवली येथील या तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा प्राप्त होण्यासाठी मंत्री दीपकभाई केसरकर यांनी प्रयत्न केले असून आरवली गावचे सुपुत्र, इतर मागास वर्ग समितीचे प्रमुख आमदार मंगेश कुडाळकर यांचे शासकीय स्वीय सहाय्यक आणि विधानभवनातील अधिकारी राजेंद्र भानजी यांनी विशेष प्रयत्न आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर विधान भवन येथील मच्छिंद्र पाटील देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, डॉक्टर साळगावकर आणि समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न केले होते.
देवस्थानला ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे परिसरातील अनेक विकास कामांना चालना मिळणार असून अनेक सोयी सुविधा निर्माण करता येणार आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या श्री देव वेतोबा यात्रोत्सवाच्या दरम्यान राजेंद्र भानजी यांचा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. हा सन्मान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत राय यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी सावळाराम टांककर, सदस्य डॉक्टर प्रसाद साळगावकर, सुनील दळवी, मंगेश दळवी, पुरुषोत्तम दळवी आदींसह राजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, सुनील करगुटकर, राकेश दांडेकर, सौ शुभदा भानजी, संतोष सारंग आदी मान्यवर उपस्थित होते.