रत्नागिरी, ता. २२ : सीए अभ्यासक्रमाकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे याकरिता लवकरच धोरण ठरवण्यासाठी महिन्याभरात निर्णय घेऊ. असे धोरण ठरवणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे व्यक्त केला. तसेच रत्नागिरी सीए ब्रॅंच कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे मथुरा एक्झिक्यूटीव्ह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल बॉडीच्या अध्यक्षांसह समितीने रत्नागिरीला भेट दिली. या वेळी सेंट्रल कौन्सिल मेंबर सीए चंद्रशेखर चितळे, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल बॉडीचे अध्यक्ष सीए मनिष गाडिया, उपाध्यक्ष सीए दृष्टी देसाई, सेक्रेटरी सीए अर्पीत काब्रा, विकासा अध्यक्ष सीए यशवंत कासार, रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए आनंद पंडित व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री सामंत यांनी सांगितले, माझा व सीएंचा संबंध पाच वर्षांनी येतो. सीएंचा सल्ला घेऊनच मी फॉर्ममध्ये माहिती भरतो. आज मला एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली. सीए आनंद पंडित यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यालयासाठी जागा देण्याकरिता नगरपालिकेशी बोलतो. रत्नागिरी छोटे शहर आहे. परंतु नगरपालिकेची पूर्तता झाल्यावर जागा मिळेल, असे स्पष्ट केले.
आम्ही विद्यार्थ्यांना बीकॉम, एमकॉम होण्यासाठी सांगतो. पण देशाकरिता सीएंचीसुद्धा जास्त गरज असल्याने या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे याकरिता येत्या महिन्याभरात धोरण ठरवतो. याकरिता इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम ठरवू. ते विद्यापीठामार्फत कसे पुढे नेता येईल, ते पाहूया. वर्षभरात असा उपक्रम सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
माझे समोर बसलेले काही सीए मित्र कसा अभ्यास करत होते, हे मी पाहिले आहे. त्यांचा अभ्यास बघूनच गरगरायचे. मला वाटते सीएपेक्षा राजकारण बरे. पण आज पाच दशके सीए करणारे एच. एल. पटवर्धन, नीळकंठ पटवर्धन यांच्यासारखे सातत्य आमच्यात नाही. आम्हाला दर ५ वर्षांनी लिटमस, अॅसिड टेस्ट द्यावी लागते, असे मंत्री सामंत म्हणाले. आपण संघटना चालवताना आदर्शपणे चालवणे हे महत्त्वाचे. त्याप्रमाणेच रत्नागिरीच्या सीएंनी चिपळूण पूरग्रस्तांना सढळहस्ते मदत केली आहे. आपण जे मिळवतो ते समाजासाठी दिले पाहिजे ही त्यामागची भावना होती, याबद्दल मी कौतुक करतो असे सामंत यांनी सांगितले.
या वेळी मान्यवरांचा सत्कार कमिटी मेंबर सीए बीपिन शाह, सीए अॅंथनी राजशेखर यांनी केले. सीए कमलेश मलुष्टे आणि सीए अक्षय जोशी यांनी सूत्रसंचालन केले. रत्नागिरी शाखा उपाध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर यांनी आभार मानले.