(मुंबई)
राज्यातील सर्व कारागृहे जवळजवळ ‘हाऊस फुल्ल’ झाले आहेत. राज्यात लहान मोठे, खुले तसेच मध्यवर्ती असे एकूण ६० कारागृहे आहेत. या कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्यात आले आहेत. अनेक कारागृहात क्षमतेपेक्षा ३ ते ४ पट कैद्यांची संख्या असून दिवसेंदिवस कैद्यांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील एकूण ६० कारागृहातील कैद्यांची वास्तविक क्षमता २४ हजार ७२२ इतकी असताना सध्या या कारागृहामध्ये ४१ हजार १९१ कैद्यांना ठेवण्यात आले आहे, दिवसेंदिवस नवीन कैद्यांची भरणा होत असल्यामुळे या कैद्यांना ठेवायचे कुठे? असा प्रश्न कारागृह प्रशासनाला पडला आहे.
जवळपास राज्यातील सर्वच कारागृह हाऊसफुल्ल झालेली असून प्रत्येक कारागृहात दुप्पट तिप्पट कैद्यांची संख्या झाली आहे. अनेक कैद्यांना जामीन होऊन देखील जामीनदार किंवा तसेच जमिनासाठी पैसे नसल्यामुळे हे कैदी जामीन होऊनही कारागृहात खितपत पडलेले आहेत. तसेच, अनेक न्यायबंदीची न्यायालयीन सुनावणी लांबणीवर पडत असल्यामुळे हे न्यायबंदीदेखील कारागृहात अनेक वर्षांपासून बंदी आहे. त्यात येणा-या नवीन कैद्यांमुळे कारागृह हाऊसफुल्ल होऊन कैद्यांची संख्या तीन ते चार पटीने वाढली आहे.
वाढत्या कैद्यांच्या संख्यापुढे कारागृहातील अधिकारी कर्मचारी अपुरे पडत आहेत. त्यात कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या बॅरेकमध्ये कैद्यांची संख्या जास्त असल्यामुळे कैद्यांना निद्रानाश, त्वचारोग, व इतर आजारांनी ग्रासले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर तुरुंगात राहण्यावरून, झोपण्यावरून कैद्यांमध्ये हाणामारी होऊन भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये सर्वात वाईट परिस्थिती सामान्य कैद्यांची आहे. सामान्य कैद्यांना बड्या गुन्हेगाराना घाबरून राहावे लागत आहे.
राज्यातील ६० कारागृहांपैकी पुण्यातील येरवडा, नाशिक, ठाणे, कल्याण आणि मुंबईतील परिस्थिती भयानक आहे. कैद्यांच्या आकडेवारीवरून याची भीषणता समोर आली आहे. या कारागृहांपैकी सर्वात जास्त क्षमता असलेले कारागृह म्हणजे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह आहे. या कारागृहाची कैद्यांना ठेवण्याची क्षमता २ हजार ४४९ आहे, त्यात पुरुष कैदी २ हजार ३२३ आणि महिला कैदी १२६ एवढी असताना या कारागृहात सध्याच्या घडीला ६ हजार ८२१ कैद्यांना ठेवण्यात आले आहे.