(मुंबई)
महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठी घडामोड झाल्याची पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत शपथ घेतलेले 8 मंत्री, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार प्रफुल्ल पटेल आणि नवे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवार यांची अचानक भेट घेतली. शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी एकसंध ठेवण्यासाठी विनंती करण्यासाठी भेट घेतली, असे त्यांनी सांगितले. मात्र शरद पवार यांनी त्यांचे बोलणे केवळ ऐकले, परंतु त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. बंड केल्यामुळे जनतेत निर्माण झालेला विरोध निवळावा यासाठी अजित पवारांची ही राजकीय खेळी होती असे म्हटले जाते.
शरद पवार आणि अजित पवार गटाची एक तास भेट झाली. ही भेट झाल्यावर चव्हाण सेंटरच्या बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार आमचे आदरणीय नेते आहेत, दैवत आहेत. आज शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी कुठलीही वेळ न मागता इथे आलो आहोत. शरद पवार एका बैठकीसाठी इथे आले आहेत, हे कळले म्हणून आम्ही संधी साधून इथे आलो. यावेळी आम्ही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले. सर्वांनी त्यांना विनंती केली आहे की, आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर आहेच. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहावी याबाबत आपण विचार करावा. मात्र, शरद पवार यांनी सर्व ऐकून घेतले. मात्र यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
अजित पवार गट शरद पवारांना भेटण्यासाठी गेला असताना वाय. बी. चव्हाण सेंटरवर काय घडलं याची ईनसाईड स्टोरीसमोर आली आहे. छगन भुजबळ पवारांच्या समोर आले आणि विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, असं म्हणत थेट पवारांच्या पाया पडले. त्यानंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे, मुंडे आदि जवळपास सर्वच नेते पवारांच्या पाया पडत हात जोडले, अशी माहिती आहे.
अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस गटाची बैठक संपवून सगळे नेते सरळ थेट वाय. बी. चव्हाण सेंटरला गेले. या घडामोडींमुळे खळबळच माजली. दोन्ही गट पुन्हा एकत्र येतात का अशी चर्चा सुरू झाली. ही भेट चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधानसभेच्या दालनात विरोधी पक्षांच्या बैठकीत होते. जयंत पाटील यांना तिथेच सुप्रिया सुळे यांचा फोन आला की, साहेबांनी तातडीने वाय.बी. सेंटरला बोलावले आहे. त्यानंतर जयंत पाटील आणि आव्हाड दोघे तातडीने वाय. बी. चव्हाण सेंटरला निघाले असता पत्रकारांनी जयंत पाटील यांना गराडा घातला. तेव्हा जयंत पाटील म्हणाले की, कशाला बोलावले मला माहितच नाही. फोन आला म्हणून मी निघालो. अजित पवार तिकडे आले आहेत असे सांगितल्यावर जयंत पाटील म्हणाले की, ते का आले आहेत ते मला खरोखरच माहीत नाही.
पवारांशी भेट झाल्यावर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अजित पवारांसोबत शपथ घेतलेले सर्व मंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ व इतर नेते यांनी अचानक शरद पवारांची भेट घेत दिलगिरी-खंत व्यक्त केली. सध्या जो गुंता झाला आहे, त्यातून मार्ग काढावा असे म्हणत पक्ष एकसंध ठेवण्याची विनंती केली. यावर शरद पवारांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आमच्या दृष्टीने ही अनपेक्षित घटना होती. आम्ही याचा विचार केला नव्हता. त्यामुळे याविषयी आता काही भाष्य करता येणार नाही. शरद पवार यांच्याबरोबर बसून याविषयी चर्चा करू. मात्र या घटनेनंतर स्वत: शरद पवार पत्रकारांसमोर आले नाहीत.