(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष आण्णा जाधव, दक्षिण जिल्हाध्यक्ष रूपेंद्र जाधव, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर या तीन जिल्हाध्यक्ष यांनी सोमवारी (२७ फेब्रुवारी रोजी) राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला जेरबंद करण्यात आला आहे. या सगळ्या धक्कादायक जीवघेण्या प्रकरणात वारीशे यांचे कुटुंब कोलमडून पडले. त्यांच्या कुटुंबाची व्यथा माध्यमांनी लावून धरत वास्तव जगासमोर आणले. आणि कुटुंबाला मदत करण्याच्या मागणीने जोर धरला. अशातच वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी देखील खारीचा वाटा उचलत वंचीत बहुजन आघाडीतर्फे छोटीशी मदत करण्यात येईल, असे काही दिवसापूर्वी सांगितले होते. याप्रमाणे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवंगत पत्रकार वारीशे यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी राजापुरातील कशेळी गावात पोहोचले.
मात्र कशेळी गावातील घरी कोणीच राहत नसल्यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांनी वारिशे कुटुंब रत्नागिरी येथील नातेवाईकांकडे राहत असल्याचे सांगितले. वंचित बहुजन आघडीची टीम २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रत्नागिरी नातेवाईकांच्या घरी पोहोचली. यावेळी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी रोख रक्कम ५० हजार रुपयांची मदत दिवंगत पत्रकार वारीशे यांच्या आईकडे सुपूर्द केली. तर शिक्षण घेत असलेल्या वारीशे यांचा मुलगा यश यालाही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी कुटुंबियांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याचे सांगितले.
भूमाफिया आरोपी पंढरीनाथ आंबेरकरने पत्रकार वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून खूनच केला. एव्हढा भयानक प्रकार घडवून आणणे आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला हात लावणे किंवा लोकशाहीला उध्वस्त करणे म्हणजेच सर्व जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. आणि ही गदा कदापि आम्ही सहन करणार नाही. घटनात्मक दिलेल्या अधिकाराचा वापर करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी असेल.
– उत्तर जिल्हाध्यक्ष विकास उर्फ आण्णा जाधव